कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये सायबर जनजागृती कार्यक्रम संपन्न

रत्नागिरी : आजच्या काळात मोबाईल, इंटरनेट याचा वापर फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. दैनंदिन जीवनाचा तो एक अविभाज्य भाग झाला आहे. पण त्याच्या फायद्यांबरोबर अनेक धोकेही दिसून येत आहेत. अनेक फसवणुकीचे प्रकारही घडत आहेत. त्यादृष्टीने सायबर जनजागृती होणे, अत्यंत गरजेचे झाले आहे. याच हेतूने रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शिक्षक-पालक सहविचार सभेच्या माध्यमातून सायबर जनजागृतीबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
रत्नागिरीतील प्रतिथयश सायबर तज्ज्ञ डॉ. अक्षय पाठक हे मार्गदर्शक म्हणून यावेळी लाभले होते. सायबर सुरक्षित, जागरुक आणि डिजिटलदृष्ट्या सक्षम समाज घडविण्यासाठी सायबर सुरक्षेचे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे काम ते स्वेच्छेने करतात. या मार्गदर्शन सत्रामध्ये त्यांनी सुरक्षित इंटरनेटचा वापर, सायबर क्राईम प्रतिबंध, ऑनलाईन फ्रॉडपासून संरक्षण आणि सोशल मीडिया सेफ्टी अशा विविध मुद्द्यांवर शिक्षक व पालकांना उद्बोधक मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विविध प्रकारच्या फसवणुकीसंदर्भात सत्य घटनांचे अनेक दाखले दिले. सायबर गुन्ह्यांमधील धोके कसे टाळावेत यासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या. सायबर गुन्हा घडल्यास त्वरित काय करावे आणि काय टाळावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शासनाची अधिकृत वेबसाईट, संचार साथी ॲप, १९३० हा अधिकृत हेल्पलाइन नंबर यांचा वापर कसा व कधी करावा ते समजावून दिले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सायली राजवाडे यांनी डॉ. अक्षय पाठक यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल सन्मानचिन्ह व पुष्प देऊन त्यांना धन्यवाद दिले. तसेच सर्व शिक्षक व पालक बंधू भगिनींनी या मार्गदर्शनातून बोध घेऊन सावध रहा, सुरक्षित रहा असा संदेश दिला. आपण सर्वांनी या बाबतीत सजग राहूया, असेही सांगितले. बालवाडी विभागातील ज्येष्ठ शिक्षिका प्रज्ञा सुर्वे, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गुरुप्रसाद जोशी हे यावेळी उपस्थित होते. बालवाडी व प्राथमिक विभागातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक बंधू भगिनी यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. मार्गदर्शन सत्र यशस्वी होण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक प्रतिनिधींनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन दुर्वा भोरे यांनी केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज पाटणकर यांनी या मार्गदर्शन सत्राबद्दल समाधान व्यक्त केले.



