तिवरे धरणग्रस्तांना घरे मिळवून दिल्याबद्दल पालकमंत्री सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव चिपळूण पं.स.त एकमुखाने मंजूर

चिपळूण : तिवरे धरणफुटीच्या भीषण दुर्घटनेत बेघर झालेल्या बाधित ग्रामस्थांना शासनामार्फत हक्काची घरे मिळवून देण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डाॕ उदय सामंत यांनी घेतलेल्या विशेष प्रयत्नांची दखल घेत, चिपळूण पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
चिपळूण पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही सर्वसाधारण सभा सभापती सूर्यकांत खेतले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.
तिवरे धरण दुर्घटनेतील बाधितांचे अश्रू पुसून त्यांना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी पालकमंत्री डॉ. सामंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला आणि शासनाकडून घरकुलांची व्यवस्था मार्गी लावली. त्यांच्या या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पंचायत समिती सदस्य विनोद झगडे यांनी पालकमंत्री सामंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावाला सभागृहाने एकमुखाने पाठिंबा देत मंजुरी दिली.
या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे धरणग्रस्त कुटुंबांना मिळालेल्या दिलाशाबद्दल लोकप्रतिनिधींनी पालकमंत्र्यांचे जाहीर आभार मानले. या बैठकीला पंचायत समितीचे सदस्य, गटविकास अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.



