लेकीला हॉटेल उद्योग सुरू करून देण्याचे स्वप्न अधुरे
संतोष गायकवाड यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाचा मोठा आधार हरपला

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही अपघातांचे सत्र सुरू असून शनिवारी रात्री उशिरा अंजणारी पुलावर झालेल्या अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी आहे. महामार्गावर अवघड उतार असतानाही भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर पोलिसांच्या बोलेरो गाडी मागून धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहने दरीत कोसळली. कंटेनर चालक व क्लीनर या दोघांचाही या भीषण अपघातात चिरडून मृत्यू झाला आहे.हातखंबा येथील सहायक पोलीस निरीक्षक संतोष आप्पासाहेब गायकवाड (वय ५१) यांचाही दुर्दैवीरित्या अपघाती मृत्यू झाला आहे. कर्तव्यावर असताना निष्ठुरनियतीने डाव साधल्याने कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मेजर गायकवाड यांचे आपल्या मुलीला हॉटेल उद्योग सुरू करून देण्याचे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे.
संतोष गायकवाड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आई-वडील, भाऊ, भावजय असे कुटुंब आहे. संतोष यांच्या लेकीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केला होता. तिला या क्षेत्राची आवड असल्याने लेकीच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी, हॉटेल व्यवसाय सुरू करून देणार होते यासाठी त्यांचे प्रयत्नही सुरू होते; मात्र निष्ठूर नियतीमुळे हे त्यांचे स्वप्न अधुरे राहिले. गायकवाड यांनी आपल्या दोन्ही मुलांना उच्च विद्याविभूषित होण्यासाठी शिक्षणासाठी बळ दिले. त्यांच्या मुलानेही इंजिनिअरिंग पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल आहे, अशी माहिती गायकवाड कुटुंबीयांच्या निकटवर्तीयांनी दिली.
कर्तव्यदक्ष असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेले संतोष गायकवाड हे मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाचे होते. १९९५-९६ दरम्यान त्यांच्या महाराष्ट्र राज्य पोलीस सेवेच्या कारकिर्दीस सुरुवात केली होती. त्यांच्या सेवेला या ३० नोव्हेंबर रोजी तीस वर्षे पूर्ण होणार होती. त्यांना येत्या दोन-तीन वर्षांत पोलीस उपनिरीक्षक म्हणून बढती मिळण्याचाही योग होता.
गायकवाड कुटुंब मूळचे पाचांबे (ता. संगमेश्वर) येथील आहे. पाचांबे या गावाचे धरणामुळे अन्यत्र ठिकाणी सावर्डेजवळ नायशी येथे पुनर्वसन करण्यात आले. संतोष हे रत्नागिरी जवळ खेडशी येथे स्थायिक झाले होते. संतोष यांचे वडीलही पोलीस खात्यात सेवेत होते. ते काही वर्षांपूर्वीच निवृत्त झाले आहेत; मात्र गेले अनेक दिवस ते आजारपणाने त्रस्त आहेत. घराचा मोठा आधार असलेले संतोष गायकवाड यांच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने रत्नागिरी पोलिसांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. मदतशील व सहकार्य करणारे असलेले संतोष हे मित्रमंडळी आणि सहकाऱ्यांमध्येही लोकप्रिय होते. त्यांच्या अपघाती मृत्यूने कुटुंबाबरोबरच त्यांच्या नातेवाईकांना, सहकाऱ्यांना, मित्रांनाही मोठा धक्का बसला आहे. रत्नागिरी पोलीस दलाकडून त्यांना मानवंदना देण्यात आली. रविवारी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शनिवारी रात्री उशिरा अंजणारी नदीपात्रात वाहनाचा अपघात झाल्याचा कॉल आला म्हणून हे दोघे पोलीस कर्मचारी बोलेरो जीप घेऊन कर्तव्यावर निघाले होते. पण काही वेळातच निष्ठुर नियतीने घाव घातला आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. काळजाचा थरकाप उडवणारा हा अपघात शनिवारी रात्री ११ ते ११.३० च्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच लांजा उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुरेश कदम, पोलीस निरीक्षक दिपाली पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, उपनिरीक्षक बळवंत पाटील आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी रात्रीच्या काळोखातही स्थानिकांच्या मदतीने युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू केले. या भीषण अपघात प्रकरणी मृत्यू झालेल्या कंटेनर चालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास लांजा पोलीस उपनिरीक्षक प्रमोद सरंगळे करीत आहेत.
गायकवाड त्यांच्यासोबत पोलीस अंमलदार (पोलीस कॉन्स्टेबल) अनिल शिंगाडे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांनाही रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयातील प्राथमिक उपचारानंतर तातडीने सांगली येथे रुग्णालयात हलवण्यात आले आहे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. कंटेनर चालक मदन सिंग (वय ४१ सेंदडा, पाली राजस्थान) व क्लीनर दिनेश सिंग (वय २५) असे मृत्यू झालेल्या कंटेनर चालक व क्लीनर यांची नावे आहेत. अवघड वळणाच्या रस्त्यावर उत्तराची असलेली परिस्थिती लक्षात न घेता भरधाव असलेल्या कंटेनरचालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाला आहे.
दरम्यान महामार्गावर जबाबदारपणे भरधाव वेगाने चालवली जाणारे मालवाहू ट्रक, कंटेनर तसेच महामार्गावर उभी राहणारी ही मालवाहू अवजड वाहने यामुळे यापूर्वीही अनेकांचे जीव गेले आहेत. महामार्गावर उभे असलेल्या मालवण ट्रक व कंटेनमुळेही आजवर अनेक अपघात घडले आहेत. त्यामुळे अवजड वाहनांच्या वाहतुकीवर व त्यांच्या थांब्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ उपयोजना केल्या जाव्यात अशी मागणी वाहन चालक प्रवासी वर्गाकडून केली जात आहे.



