दिवंगत अभिनेते विनय आपटे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शॉर्टफिल्म स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : सुप्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्माते दिवंगत विनय आपटे यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विनय आपटे प्रतिष्ठान आणि विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने लघुपट (शॉर्ट फिल्म) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शॉर्ट फिल्म पाठवण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर पर्यंत आहे.
यावर्षी शॉर्ट फिल्म्स ना विषयाचे बंधन नाही. कुठल्याही विषयावर शॉर्ट फिल्म्स पाठवता येतील. मात्र ती जास्तीत जास्त ३५ मिनिटांची असावी. तसेच या शॉर्टफिल्म्स मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत पाठवता येतील. या व्यतिरिक्त दुसऱ्या भाषेत असेल तर त्याला सबटायटल्स असावेत .
प्रत्येक स्पर्धकाला केवळ एकच प्रवेशिका पाठवता येईल. सर्वोत्कृष्ट विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धकांनी गूगल फॉर्म वर फिल्म सबमिशन आणि पेमेंट करून ३० नोव्हेंबरपर्यंत पाठवायच्या आहेत. प्रवेश मूल्य एक हजार रुपये आहे.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या शॉर्ट फिल्मला प्रथम क्रमांकाला १५ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला १० हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला ७,५०० रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येतील. या शिवाय सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट संकलक आणि सर्वोत्कृष्ट छायाचित्रणास पारितोषिक देण्यात येतील. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुप्रसिद्ध दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, दिग्दर्शिका प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शक राजन वाघधरे, जाहिरात तज्ज्ञ भरत दाभोळकर , ज्येष्ठ चित्रपट संकलक भक्ती मायाळू आणि सुप्रसिद्ध लेखिका आणि गीतकार रोहिणी निनावे हे आहेत.
संपर्क – विहान आपटे – ९७६९३३१२८७



