आरोग्यआर्टिकल

विचारांचा गाळ साठू न देता त्याचा वेळीच निचरा करा

मानसिक स्वास्थ्य…, मेंटल हेल्थ… एका कुठल्या दिवशी याबद्दल बोलून या विषयाचं गांभीर्य खरच लोकांच्या लक्षात येईल..????

“मेंटल हेल्थ” हा शब्द ऐकला की लोकांना एकच संकल्पना आठवते ती म्हणजे मानसिक आजार, वेड लागणं वगैरे वगैरे…. पण सत्य परिस्थिती खूप वेगळीच आहे आणि त्याबद्दल फारस कोणी बोलू पाहत नाही, पण अशी काही अडचण असणं यात लाजिरवाण काहीच नाही हे समजून घेणं खूप गरजेचं आहे.

आजच्या या धकाधकीच्या आयुष्यात माणूस फक्त घड्याळाच्या काट्यावर धावतोय. प्रत्येकाची प्रत्येकाला मागे टाकून पुढे जायची शर्यत चालू असते आणि आपण इतके धावतो, इतके धावतो की धावून दमल्यावर पाणी विचारणार पण कोणी नसत. मागे वळून पाहिलं की लक्षात येत आपलेपणा मागेच राहिला की. या धावपळीत सगळेच विसरलो की आपण काटे नाही माणूस आहोत.

खरं सांगू का आपल्याला कोणालाही शर्यती नंतरचा एकटेपणा नकोय, तर कदाचित हातात हात धरून साखळी धाव हवी आहे. सगळी धावपळ आयुष्याची तजवीज करण्यासाठीच असते त्यात गैर काहीच नाहीये, पण आयुष्य जगायचं विसरून जातोय आपण.

थकलात तर थांबा, दुखावलात तर आराम करा. रडू आलं तर हक्काच्या खांद्याचा आधार घ्या. It’s Okay for not being Okay….

तणाव हा आज माणसाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनला आहे. लहान मुलांना अभ्यासाचा, परीक्षांचा ताण. तरुणांना नोकरीचा, लग्नाचा. सासूला सुनेचा, सुनेला सासूचा हे आणि असे कितीतरी; पण खरंच हे सगळे विषय इतके कठीण आहेत की आपण त्यांना कठीण बनवतोय. मुळात हे समजायला हवं की प्रत्येक अडचणीवर मात नाही करता येत किंवा तसा हट्ट ही नसावा. काही अडचणींना सावरून सांभाळून टॅकल करत पुढे जावं लागत आणि या प्रवासात साथ देतो तो संवाद…

प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असावी जिच्याशी आपण निखळ संवाद साधू शकतो, कुठल्याही जजमेंटची भीती न बाळगता! कुठलंही नात असो किंवा कुठलीही परिस्थिती. संवादाने उत्तर मिळत आणि जिथे उत्तर नाही मिळत तीथे मनावरचं ओझ हलकं होत.

जसं ओंजळ भरली की त्यातली वस्तू वाट मिळेल तशी वाहणारच. तसं मनाची ओंजळ विचारांनी भरली की मग ते वाट मिळेल तसे वाहत जातात आणि त्या विचारांच्या पुरात अख्खा देह वाहून जात ज्याला आपण नैराश्य (डिप्रेशन) किंवा चिंता (Anxiety) सुद्धा म्हणतो. म्हणून म्हणते विचारांची ओंजळ इतकी ही भरून देऊ नका की तिचा बेफाम प्रवाह रोखताच येणार नाही. नको असलेल्या विचारांचा गाळ साचूनच देऊ नका. वेळीच निचरा करून टाका त्याचा. बोला… संवाद साधा…

कदाचित तुमचं सगळ छान सुंदर सुरळीत सुरू असेल; पण तुमच्या जवळची एखादी व्यक्ती या अनभिज्ञ प्रवाहात अडकली असू शकते. त्या व्यक्तीला एका आधार देणाऱ्या हाताची गरज असू शकते. ती ओळखून तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा किंवा तुमच्या त्या व्यक्तीच मन ऐका. बोलत करा. त्याला ही हलक वाटेल.

हीच ती वेळ असते जिथे आपण “मेंटल हेल्थ” सावरू शकतो. विचारांच्या चक्रव्युहात अडकण्यापासून कोणाला वाचवता आलं तर नक्की त्याला मदत करा. फक्त एक दिवस यासाठी राखीव न ठेवता सातत्याने सर्वांना मदत करूया!!!!!

सौ. चारुता केदार इंदुलकर 

सल्लागार मानसशास्त्र पदव्युत्तर पदविकाधारक आणि समुपदेशक, रत्नागिरी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!