मुख्य बातमी

जिल्ह्यात २६ नोव्हेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून ते २६ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी जारी केला आहे.

जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनातर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांसंदर्भात तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. यामध्ये १४ नोव्हेंबर रोजी बालदिन, पंडीत जवाहरलाल नेहरु जयंती, क्रांतीवीर लहुजी साळवे जयंती आहे. १५ नोव्हेंबर रोजी बिरसा मुंडा जयंती आहे. १७ नोव्हेंबर रोजी जागतिक विद्यार्थी दिन आहे. १९ नोव्हेंबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिन, राष्ट्रीय एकात्मता दिन तसेच इंदिरा गांधी जयंती साजरी करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस साजरा केला जाणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, अलोरे-शिरगांव, रत्नागिरी, जयगड तसेच देवरुख या ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून अलोरे-शिरगांव पोलीस ठाणे हद्दीत साफयीस्ट कंपनी, खेड येथील कोकोकोला कंपनी, जयगड येथील वाटद खंडाळा प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाच्या अनुषंगाने स्थानिकांकडून आपल्या विविध मागण्यासाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. तसेच जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन पुकारण्यात येते. अशावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावांमध्ये हिंदु-मुस्लिम बौध्द तसेच इतर धर्मियांची मिश्रवस्ती असल्याने काही वैयक्तीक कारणांमुळे जातीय तणावाच्या घटना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे दाखल होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो. सध्या ओबीसी व मराठा आरक्षणावरून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण झाल्याने त्यावरून आंदोलन पुकारले जात आहे.

नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली असून १० नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याअनुषंगाने संबंधित प्रत्येक पक्ष आपापल्या पक्ष वाढीसाठी मोर्चेबांधणी करत आहेत. निवडणूक प्रचारादरम्यान राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिका-टिपण्णी करणे यामुळे राजकीय तणाव निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. आगामी काळात जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता सामाजिक संघटना व राजकीय पक्ष दौरे तसेच सभा घेत असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.

शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे.

अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत.

प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!