दिव्यांगांचे कल्याणकारी परिपूर्ण प्रस्ताव गट विकास अधिकाऱ्यांकडे करण्याचे आवाहन

रत्नागिरी : जिल्हा परिषदेने स्वउत्पन्नातून दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांसाठी राखून ठेवलेल्या ५ टक्के निधीतून वैयक्तिक व सामुहिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी /त्यांचे पालकांनी, समुपदेशन तसेच सल्लामसलत करणाऱ्या केंद्रांनी कार्यालयाकडून अर्ज प्राप्त करून घेऊन आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव आपले गाव ज्या पंचायत समिती कार्यक्षेत्रात समाविष्ठ आहे, त्या गटविकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जि.प. यांनी केले आहे.
दिव्यांग व्यक्तींना सहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानासाठी अर्थसहाय्यक देणे, दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे, दिव्यांग-दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रात्साहनपर अनुदान देणे, दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडू यांना अर्थसहाय्य देणे या योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. योजनांसाठी विहीत नमुन्यातील अर्ज गट विकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय (सर्व) तसेच जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जि.प. यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.



