मोंथा वादळामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे अधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन पंचनामे करा : आमदार किरण सामंत
आमदार किरण सामंत शेतीची पाहणीसाठी शेतकऱ्यांच्या बांधावर

लांजा : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोंथा वादळामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पिके, तांदूळ, नाचणी, फळबागा तसेच झाडे कोसळणे अशा प्रकारच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी प्रशासनाला तातडीने हालचाल करण्याचे निर्देश दिले आहेत.

आमदार सामंत म्हणाले की, “वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी व महसूल, गटविकास अधिकारी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि पंचनामे करून अहवाल सादर करावा. शासनाकडून शेतकऱ्यांना शक्य तेवढी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील.” तसेच, त्यांनी संबंधित विभागांना आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आणि नागरिकांना मदतीचा हात देण्याचेही आवाहन केले.

अवकाळी पावसामुळे आणि अलीकडील वादळामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किरण सामंत यांनी पालकमंत्री उदय सामंत यांची शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील परिस्थिती, नुकसानाचे प्राथमिक अंदाज, आणि प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांची माहिती आमदार सामंत यांनी पालकमंत्र्यांना दिली. ते म्हणाले की, “शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे. शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा. मी स्वतः या संदर्भात शासनदरबारी शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी लवकरच अधिकृत मागणी करणार आहे.”
पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला नुकसानग्रस्त भागांचा तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असून, शेतकऱ्यांना शक्य तितकी आर्थिक मदत देण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
“शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू. शासनाने तत्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, हीच अपेक्षा आहे.”या नुकसान बाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे आमदार सामंत यांनी सांगितले.
यावेळी कृषी अधिकारी अभिजीत शेलार, जिल्हा नियोजन सदस्य राजू कुरूप, शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.



