रवींद्र चव्हाण माझ्या गुरुस्थानी, पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता
मुलीचा प्रचार जोमाने करणार : भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची पत्रकार परिषद

रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाचे (भाजप) माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे आपल्या गुरुस्थानी असल्याचे सांगत, त्यांच्याबद्दल असलेला आदर त्यांनी व्यक्त केला. तसेच, आपण भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला नव्हता, जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता असेही त्यांनी स्पष्ट केले.
सावंत यांची कन्या शिवानी सावंत-माने या शिवसेनेकडून (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे. या कौटुंबिक आणि राजकीय पेचप्रसंगावर बोलताना सावंत यांनी आजपासून ते आपल्या मुलीच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचे सांगितले.
“मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी, भाजपच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला नव्हता. चव्हाण यांनी एकदा सांगितले असते की पदाबरोबर भाजपचे सदस्यत्वही सोडावे लागेल, तर बारा दिवसांपूर्वी पदाचा राजीनामा दिला त्याच वेळेला सदसत्वाचाही राजीनामा दिला असता. ते महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आज राज्यात सुमारे ३०० ते ३५० नगरपालिकांची निवडणूक सुरू असूनही एवढ्या छोट्या कारणासाठी त्यांना रत्नागिरीत यावे लागले याची खंत वाटते. ते स्वतः रत्नागिरीत आले की त्यांना बोलावले गेले, असही प्रश्न यावेळी सावंत यांनी उपस्थित केला.
मागच्या वेळेस राहुल पंडित यांना मतदारांनी थेट नगराध्यक्ष म्हणून पाच वर्षांच्या कालावधीसाठी निवडून दिले होते. मात्र अवघ्या दोन वर्षातच पोटनिवडणूक लावावी लागली. मग राहुल पंडित यांना नगराध्यक्षपदाचा राजीनामा का द्यावा लागला. निवडणुकीचा खर्च हा जनतेच्या पैशातून केला जातो. आताही जर शिंदे शिवसेनेचा नगराध्यक्ष निवडून आला, तर पुढील दोन ते अडीच वर्षात नगरपालिकेची पोटनिवडणूक लागणार हे निश्चित आहे. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी का करावी, कारण नगरपालिका निवडणुका या नागरिकांचे वीज, रस्ते, पाणी आदी मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी घेतल्या जातात. राजकीय स्वार्थासाठी नाही, असे यावेळी सावंत यांनी निक्षून सांगितले.
दरम्यान, चव्हाण यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या मार्गदर्शनाला महत्त्व दिले आणि सोबतच मुलीला पाठिंबा देण्यासाठी राजकीय निर्णय घेतला. निवडणुकीच्या तोंडावर वडिलांनी मुलीच्या प्रचारासाठी बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय रत्नागिरीच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

