मुख्य बातमी

भारतीय तटरक्षक दलाचा महाअभ्यास; सागरी मार्गाने होणारे हल्ले परतवून लावण्यासाठी यंत्रणा सज्ज

महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ‘सागर कवच ०२/२५’ सागरी सुरक्षा सराव यशस्वी

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाच्या महाराष्ट्र मुख्यालयाच्या समन्वयाने १९ आणि २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवर एक व्यापक व संयुक्त असे किनारपट्टी सुरक्षा सराव ‘सागर कवच – ०२/२५’ यशस्वीरित्या पार पाडण्यात आला. या सरावाद्वारे विविध सुरक्षा संस्थांमधील उच्च दर्जाचा समन्वय, कार्यान्वित सज्जता आणि सागरी सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या तसेच समुद्री मार्गाने महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रतिष्ठापनांवर आणि मालमत्तांवर राष्ट्रविरोधी घटकांकडून होणाऱ्या देशविघातक घटकांकडून संभाव्य हल्ल्यांचा सामना करण्याची क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

या सागरी आणि तटीय कवायतीमध्ये भारतीय तटरक्षक दलासह इतर १३ केंद्रीय आणि ९ राज्यस्तरीय संस्थां ज्यात भारतीय नौदल, राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, भारतीय आर्मीची १५ जैक ली जेएके एलआय, किनारा सुरक्षा पोलीस, होम गार्ड्स, राज्य पोलीस, रेल्वे संरक्षण दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमाशुल्क, मुंबई पोर्ट ट्रस्ट, जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी, १६ छोटी बंदरे, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, राज्य गुप्तचर विभाग/ विशेष गुप्तचर विभाग, तेल हाताळणी एजन्सी, मत्स्यव्यवसाय विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी सक्रिय सहभाग घेतला.

या सरावासाठी व्यापक अशी सागरी आणि हवाई साधनसामग्री तैनात करण्यात आली होती, ज्यामुळे समुद्र, हवा आणि किनाऱ्यावर बिनचूक समन्वय साधला गेला. यामध्ये भारतीय नौदल आणि तटरक्षक दलाच्या जहाजांसह डॉर्नियर विमाने, चेतक हेलिकॉप्टर्स आणि एअर कुशन व्हेईकल्स म्हणजेच होवरक्राफ्ट्स यांचा समावेश होता. मरीन पोलीस, कस्टम्स, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, पोलीस आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या यांच्या बोटी देखील यात सहभागी झाल्या होत्या, ज्यामुळे संपूर्ण कवायतीदरम्यान मजबूत सुरक्षा व्यवस्था राखली गेली. अशाप्रकारे या सुनियोजित सरावामध्ये एकूण ४ हजारांहून अधिक कर्मचारी आणि ८० हून अधिक नौका व विमाने सहभागी झाले होते. या व्यापक सरावाचे नियोजन १० ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्र शासनाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सर्व भागधारकांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंत्रालयात आयोजित प्रारंभिक नियोजन बैठकीमध्ये करण्यात आले.

हा सराव वास्तविक वेळेमध्ये (रिअल टाईम) किनारपट्टी पाळत, संयुक्त प्रतिसाद समन्वय आणि केंद्रीय व राज्य सागरी एजन्सीमधील संपर्क प्रणाली यांच्या कार्यक्षमतेची पडताळणी करण्यासाठी आयोजित केला होता. सुरक्षेची तयारी आणि समन्वयाचे सर्व स्तरांवर मूल्यांकन करण्यासाठी विविध परिस्थितींचे सिम्युलेशन करण्यात आले ज्यात दहशतवादी हल्ले करण्यासाठी ताब्यात घेतलेल्या मासेमारी बोटी/ याट/ ट्रॉलर्स/ धो वापरून प्रशिक्षित दहशतवाद्यांना किनाऱ्यावरील लैंडिंग पॉइंट्सवर नदी/ खाड्यांचा वापर करून उतरविणे, नांगरणीवर असलेल्या व्यापारी जहाज/ टग/ ओेएसव्हीचे अपहरण, यशस्वीरित्या किनारी उतरून या राष्ट्रविरोधी घटकांद्वारे उच्च मूल्याच्या किनारपट्टी लक्ष्यांवर ताबा मिळवणे व ओलीस ठेवण्याची परिस्थिती निर्माण करणे, राष्ट्रविरोधी घटकांकडून माहिती गोळा करण्यासाठी थुराया फोन नेटवर्कचा वापर करणे आणि प्रतिसाद यंत्रणेची अचूकता व वेळेवर सक्रियता तपासणे अशा नियोजित केलेल्या काही आपत्कालीन परिस्थिती सरावादरम्यान निर्माण करण्यात आल्या होत्या. तसेच यात महाराष्ट्राच्या राजभवनाचा अतिरेक्यांद्वारे ताबा मिळविल्याच्या परिस्थितीत एनएसजीद्वारे आपत्कालीन प्रतिसाद परिस्थितींचेही सिम्युलेशन करण्यात आले.

या सरावाचे प्रमुख उद्दिष्ट बहुस्तरीय किनारपट्टी सुरक्षा संरचानेतील केंद्र व राज्य स्तरावरील विविध सहभागी सुरक्षा, गुप्तचर आणि बंदर व्यवस्थापन यासाठी जबाबदार भागधारकांच्या कार्यप्रणालीमधील कच्चे दुवे ओळखणे, किनारपट्टी सुरक्षा जाळे अधिक मजबूत करणे आणि भागधारकांमधील समन्वय व सुसूत्रता वाढवणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना विकसित करणे हे होते. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदल यांनी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर सागरी सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यास वचनबद्ध असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!