कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

पूर्वजांनी निर्माण केलेला मंदिरांचा वारसा टिकवणे हे आपणा सर्वांचे प्रथम कर्तव्य : शिल्पकार जयेश धुरी 

ओरोस : “मंदिरे म्हणजे केवळ दगड, विटा, भिंती, छप्पर नव्हे. मंदिरांची निर्मिती करण्यामागे पूर्वजांनी काही विशिष्ट विचार केला होता. तसेच कावी कला म्हणजे केवळ भिंतीवर काढलेली चित्रे नव्हेत. हे सर्व करण्यामागे आपली शैली निर्माण करणे, संस्कृती टिकवणे या उद्देशाने त्यांनी अत्यंत श्रद्धेने परिश्रमपूर्वक ही निर्मिती केली. आधुनिकतेच्या धबडग्यात हा वारसा टिकवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे,” असे मत शिल्पकार जयेश धुरी यांनी व्यक्त केले.

तळकोकणाचा सांस्कृतिक वारसा असलेल्या परंतु आता विस्मृतीत गेलेल्या कावी चित्रकलेचा प्रसार व प्रसिद्धी करण्याच्या दृष्टीने सतीश लळीत यांनी दिग्दर्शित केलेल्या व ‘घुंगुरकाठी’ संस्थेने निर्मिती केलेल्या ‘गोष्ट कावी कलेची’ या लघुपटाचा प्रिमिअर शो नुकताच निगुडे येथील मंदिरात आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन गुढीपूर पिंगुळी येथील ‘शिल्पधाम’चे प्रमुख शिल्पकार जयेश मेस्त्री बोलत होते. यावेळी ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत, कावी चित्रकार अमोल टिळवे, स्थापत्य विशारद नंदन सावंत, लेखिका, कवयित्री डॉ. सई लळीत, अभ्यासक समीर गोवेकर यावेळी उपस्थित होते.

श्री. मेस्त्री यांनी कलानिर्मितीची प्रक्रीया सांगताना कलाकार कोणत्यातरी दृष्टीने कलेची निर्मिती करतो, हे लक्षात घेणे गरजेचे आहे, असे सांगितले. मंदिरांसारख्या वास्तु उभारताना, तेथे कलाकुसर करताना आपल्या पूर्वजांनी अनेक बाबींचा विचार केला होता. स्थानिक उपलब्ध वस्तुंचा वापर, टिकाऊपणा, खर्चात बचत, दीर्घकालिन वापर, याचबरोबर अतिशय उच्च दर्जाची सोंदर्यदृष्टी त्यांच्याकडे होती. जुन्या घालेल्या मंदिरवास्तुंचा जीर्णोद्धार करताना याचा विचार केला जात नाही, ही खेदाची गोष्ट आहे, असे ते म्हणाले.

या लघुपटाची निर्मिती करण्याच्या संकल्पनेबाबत श्री. लळीत म्हणाले की, निगुडे येथील माऊली रवळनाथ पंचायतन मंदिराचे नूतनीकरण करताना मंदिराच्या भिंती व स्तंभांवरील प्राचीन कावी चित्रकलेचा विनाश न होऊ देता ती पुढील पिढ्यांकरिता सुरक्षित राखण्याचे ऐतिहासिक काम निगुडे गावचे ग्रामस्थ व मंदिर समितीचे पदाधिकारी यांनी केले आहे. मंदिर संवर्धन व जपणूक या बाबतीत संपुर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याने निगुडे गावाचा आदर्श घेतला पाहिजे.

श्री. लळीत यांनी कोकणच्या प्राचीन काळापासून विकसित झालेल्या मंदिररचनाशैलीचे महत्व अधोरेखित करत तिचे जतन करण्याची गरज असल्याचे सांगितले. जुन्या पारंपरिक कोकणी वास्तुशैलीच्या मंदिरांचा जीर्णोद्धार करताना मागचा पुढचा विचार न करता ठोकळेबाज पद्धतीने उभारलेली सिमेंटची आधुनिक मंदिरे ही कोकणच्या संस्कृतीशी विसंगत असून ती तीस-पस्तीस वर्षांहून अधिक काळ टिकणार नाहीत, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. जीर्णोद्धार करताना मूळचे सर्व बांधकाम पाडून नवीन उभारणे, ही चुकीची संकल्पना आहे. जुन्या वास्तुचे नूतनीकरण करणे आणि ते करताना मूळ ढाच्याला, कलाकृतींना पुनर्जिवित करणे अपेक्षित आहे. आणि हे करता येते हे निगुडे गावाने सिद्ध केले आहे, असे ते म्हणाले.

संध्याकाळच्या आरतीनंतर रात्री 8 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. समीर गोवेकर यांचेही भाषण झाले. त्यानंतर श्री. लळीत यांनी बनवलेल्या लघुपटाचा सर्व उपस्थितांनी आनंद घेतला. हा लघुपट लवकरच यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमुख मानकरी शांताराम गावडे यांनी केले. या कार्यक्रमाला श्री देवी माऊली देवस्थान समितीचे अध्यक्ष रवींद्र शशिकांत गावडे, उपाध्यक्ष बापू भास्कर गावडे, खजिनदार समीर नारायण गावडे, देवस्थानचे प्रमुख मानकरी श्री. गंगाराम गावडे, पांडुरंग गावडे, मयुरेश गावडे, बाबाजी गावडे, असनिये येथील पर्यावरणवादी कार्यकर्ते संदीप सावंत, त्याचप्रमाणे महिला आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!