पाटपन्हाळे महाविद्यालयात ‘पारिजात भित्तिपत्रक’ प्रकाशन सोहळा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वांड्:मय मंडळ व मराठी विभागाच्या वतीने पारिजात भित्तिपत्रकाचे प्रकाशन उत्साहातकरण्यात आले. प्र. प्राचार्य डॉ. सुभाष खोत यांच्या अध्यक्षतेखाली, मराठी विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांच्या उपस्थितीत प्रा. मनाली बावधनकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडला.
प्रारंभी मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले. साक्षी पवार व सहकारी यांनी ‘हीच आमुची प्रार्थना’ हे गीत गाऊन ईशस्तवन म्हटले. महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुभाष खोत यांच्या हस्ते प्रमुख वक्ते मा. प्रा. मनाली बावधनकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाची प्रस्तावना करताना वसुंधरा रोहिलकर हीने आजच्या आधुनिक युगामध्ये वाचन व लेखन संस्कृती लोप पावत असल्याचे सांगून आजच्या विद्यार्थ्यांमध्ये वाचन व लेखन संस्कृती वाढावी- रुजावी, भावी विद्यार्थी सुसंस्कारीत व्हावा आणि त्यातूनच एखादा लेखक, साहित्यिक घडावा अशी वांड्:मय मंडळाची भूमिका असल्याचे सांगितले.
मराठी विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव यांनी प्रमुख मार्गदर्शक प्रा. मनाली बावधनकर यांचा परिचय करून दिला. यावेळी प्रा. बावधनकर यांनी भित्तिपत्रक म्हणजे बालपणातील रुजलेला आरसा, मनाचा ठाव घेणारे पत्रक असल्याचे नमूद केले.
त्या म्हणाल्या, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात सामाजिक भान जपत समाजाचे संवेदनशील पद्धत्तीने निरीक्षण करून विविध प्रकारचे लेखन केले पाहिजेत. समुद्रातून एखादा मोती निवडावा, तसा साहित्यिक भाषेचा वापर करत असतो. इंग्रजीतील लव या एकाच शब्दासाठी मराठीतील प्रेम, माया, जिव्हाळा, अनुलोप, स्नेह असे विविध प्रकारचे कितीतरी शब्द आहेत. त्याचा उपयोग साहित्यिक कितीतरी कुशलतेने करत असतो. पारिजात म्हणजे प्राजक्त. आपल्या मनातील विचारांचा लेखनाद्वारे पारिजातकाच्या फुलांसारखा सडा पडावा असे भरभरून आपण लेखन करावे.”
महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. सुभाष खोत यांनी वांड्:मय मंडळाच्या कार्याचे कौतुक करून महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी असेच विविध उपक्रम राबवावेत त्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्याचे अश्वासन दिले.
महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव साहिल आग्रे व वांड्:मय मंडळाचे अध्यक्ष अदिती कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला डॉ. प्रसाद भागवत, प्रा. लंकेश गजभिये, प्रा. कांचन कदम, प्रा. सौम्या चौघुले, ग्रंथपाल धनंजय गुरव, महाविद्यालयाचा विद्यार्थी सचिव साहिल आग्रे, वांड्:मय मंडळ अध्यक्ष अदिती कुलकर्णी, उपाध्यक्ष रंजित पाष्टे, सचिव निखिल टानकर व वांड्:मय मंडळाचे सर्व पदाधिकारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वांड्:मय मंडळाची जनसंपर्क अधिकारी नुपूर कारेकर हीने केले, तर उपस्थित मान्यवर व श्रोत्यांचे आभार वांड्:मय मंडळ कोषाध्यक्ष समृद्धी घाणेकर हीने मानले.


