रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाकडून पुणे येथे विविध अंमली पदार्थ नष्ट

रत्नागिरी : ड्रग्ज डिस्पोजल समितीचे अध्यक्ष तथा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे व पथकाने एनडीपीएस कायद्याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण दाखल ६५ विविध गुन्ह्यातील १८१ किलो १४१ ग्रॅम १०५ मिलिग्रॅम मुद्देमाल रांजणगाव (पुणे) येथे आज (२६ डिसेंबर) सुरक्षितरित्या जाळून नष्ट केला आला.
पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य-मुंबई, यांनी एनडीपीएस ॲक्ट १९८५ अंतर्गत दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्दे माल नाश करण्यासाठी सर्व पोलीस अधीक्षकांना निर्देश केले होते. त्या अनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ड्रग्ज डिस्पोजल समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे हे असून, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी व पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) राधिका फडके या समितीच्या सदस्य आहेत.

या समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, यांनी रत्नागिरीमध्ये एनडीपीएस कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याची कार्यवाही करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांना पुढील निर्देश दिले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून सन २०२० ते सन २०२५ या कालावधीत गुंगी कारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम, १९८५ या कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी एकूण ६५ गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेतले. त्याप्रमाणे हा मुद्देमाल जाळण्याच्या पद्धतीने नाश करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून या गुन्ह्यातील मुद्देमाल रांजणगाव (पुणे) महाराष्ट्र एनविरो पॉवर लिमिटेड एमआयडीसी येथे नाश करण्यासाठी मंजूरी दिली.
त्याप्रमाणे गांजा (82 किलो 981 ग्रॅम 75 मिलिग्रॅम), चरस (97 किलो 899 ग्रॅम), ब्राऊन हेरॉइन (252 ग्रॅम 30 मिलिग्रॅम) आणि एमडी (9 ग्रॅम) यांचा समावेश होता. असा एकूण १८१ किलो १४१ ग्रॅम १०५ मिलिग्रॅम मुद्देमाल सुरक्षित रित्या जाळून नष्ट केला.



