दाहक वास्तव आणि सत्य परखड भाषेत मांडल्याने नारायण सुर्वे यांची कविता अभिजात दर्जाची : संध्या तांबे

सिंधुदुर्गनगरी : आपल्या कवितेतून नारायण सुर्वे यांनी जीवनात भोगलेले दाहक वास्तव आणि सत्य परखड भाषेत आणि थेटपणे मांडल्यानेच त्यांची कविता अभिजात दर्जाला पोचली, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांनी नुकतेच येथे केले.
‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या अकराव्या मासिक कार्यक्रमात त्या बोलत होत्या. कवी नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ओरोस येथील दत्तराज सोसायटीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी श्रीमती तांबे यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
श्रीमती तांबे यांनी सुमारे एक तासाच्या भाषणात कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनचरित्राची माहिती देत त्यांच्या कवितांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, अनाथ म्हणून जन्मलेले सुर्वे गिरणगावात अत्यंत हलाखीचे आणि कष्टमय जीवन जगले. गिरणी कामगार असलेल्या गंगाराम सुर्वे आणि त्यांची पत्नी काशीबाई यांनी त्यांचा पोटच्या पोरासारखा सांभाळ केला. गरीबीमुळे ते त्यांना चवथीपर्यंतचेच शिक्षण देऊ शकले. गंगाराम सुर्वे निवृत्तीनंतर हेत (वैभववाडी) येथील आपल्या गावी परतले आणि दहाबारा वर्षांचा नारायण पुन्हा एकदा अनाथ झाला. कधी हमाली तर कधी हरकाम्या अशी कामे करीत त्यांनी सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि ते प्रथम शिपाई म्हणून पालिकेच्या शाळेत रुजू झाले. १९६१मध्ये ते नायगावच्या शाळेत शिक्षक म्हणून लागले आणि नंतर ‘गिरणगावचे सुर्वे मास्तर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
परंतु हा प्रवास अत्यंत खडतर आणि परीक्षा घेणारा ठरला, असे सांगून श्रीमती तांबे म्हणाल्या की, परळच्या चाळीत राहताना सुर्वे यांना गरीबी, अवहेलना आणि उपेक्षेचे मोठे चटके बसले. झोपडपट्टीतील जीवन त्यांनी अनुभवले. कष्टकरी, गिरणगावातील गिरणी कामगारांचे हलाखीचे जीवन त्यांनी जवळून अनुभवले. तीच दाहकता आणि भोगलेले, पाहिलेले वास्तव त्यांनी थेट भाषेत कवितेतून मांडले. १९६२ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘ऐसा गा मी ब्रह्म’ या पहिल्याच कवितासंग्रहाने मराठी साहित्य जगताचे लक्ष वेधून घेतले. या संग्रहाला शासनाचा पुरस्कारही मिळाला. याच काळात ते साम्यवादी विचारांकडे वळले आणि त्यांनी ‘कामगार आहे मी तळपती तलवार आहे, सारस्वतांनो थोडासा गुन्हा करणार आहे’ असा थेट इशारा प्रस्थापितांना दिला. नंतरच्या सर्व लेखनातून त्यांनी शोषित, कामगार, शरीरविक्रय करणाऱ्या स्त्रिया, दारिद्याने पिचलेला निम्नवर्गीय यांचे दाहक दु:ख सातत्याने आपल्या कवितांमधुन थेटपणे मोडले. यामुळेच त्यांची कविता अमर ठरली.
प्रास्ताविकात सतीश लळीत यांनी कवी नारायण सुर्वे यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेतला. ते म्हणाले, अनाथ म्हणून जन्मलेले, हमाली आणि घरगडी म्हणून काम करणारे सुर्वे यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर मराठी सारस्वतात मानाचे स्थान प्राप्त केले. साठोत्तरी मराठी कवितेत सुर्वे यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांना १९९८मध्ये शासनाने ‘पद्मश्री”उपाधीने गौरविले, तर २००४साली त्यांना मानाचा ‘जनस्थान’ पुरस्कार मिळाला. १९९५ याली परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. नारायण सुर्वे यांच्या कवितेशिवाय मराठी साहित्याची कल्पनाही करता येणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी नारायण सुर्वे यांच्या मुलाखतीची संग्रहित चित्रफीत मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आली. या कार्यक्रमाला डॉ. सई लळीत, डॉ. मिलिंद बोर्डवेकर, ॲड, सुधीर गोठणकर उपस्थित होते. पुरुषोत्तम लाडू कदम आणि मनोहर सरमळकर यांनी सुर्वे यांच्या कविता सादर केल्या. लंडन येथे वास्तव्याला असलेली व मूळ ओरोस येथील अभया पुरुषोत्तम कदम हिने सुर्वे यांची एक कविता सादर केली.



