अज्ञाताने लावलेल्या आगीत गुहागर मासू येथील प्रगतशील शेतकऱ्याचे मोठे नुकसान
शासनाकडून तातडीच्या मदतीची मागणी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील मासू गावातील प्रगतशील शेतकरी मनोज भोजने यांच्या शेतामध्ये अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या आगीत अंदाजे १०० आंब्याची झाडे, ५० पोकळीची झाडे तसेच सुमारे ५०० काजूची झाडे जळून खाक झाली आहेत. संबंधित शेताचे एकूण क्षेत्र सुमारे पाच एकर असून या आगीमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.

या घटनेची तात्काळ दखल घेत कृषी अधिकारी व तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे नुकसान नैसर्गिक किंवा अपघाती नसून अज्ञात व्यक्तीच्या जाणीवपूर्वक केलेल्या कृत्यामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

मनोज भोजने हे प्रगतशील शेतकरी असून त्यांनी अनेक वर्षे मेहनतीने उभे केलेले फळबागांचे उत्पादन या घटनेमुळे उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी त्वरित पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी तसेच शासनाकडून विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्ग व ग्रामस्थांकडून होत आहे.

या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.



