मुख्य बातमी

‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ रासायनिक प्रकल्पाबाबत सर्व पर्यावरणीय निकषांचे काटेकोर पालन

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांची राज्यसभेत माहिती 

नवी दिल्ली : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम औद्योगिक क्षेत्रातील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज’चा रासायनिक प्रकल्प सर्व पर्यावरणीय निकषांचे काटेकोर पालन करत असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. या प्रकल्पाबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल राज्यमंत्री कीर्ती वर्धन सिंह यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकल्पाची सखोल तपासणी केली असून, तेथील सांडपाणी प्रक्रिया आणि वायूप्रदूषण नियंत्रण यंत्रणा पूर्ण क्षमतेने आणि कार्यक्षमतेने सुरू असल्याचे सरकारने लेखी उत्तरात नमूद केले आहे.

नोव्हेंबर २०२५ मध्ये या प्रकल्पाची संयुक्त तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचे अहवाल समाधानकारक असून प्रकल्पातून होणारे उत्सर्जन विहित मर्यादेत असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, कंपनीने घातक कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केला असून, पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी ‘क्लोज्ड-लूप सिस्टीम’चा वापर केला जात आहे. यामुळे कोणतेही घातक सांडपाणी थेट निसर्गात सोडले जात नसल्याची खात्री प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली आहे.

PFAS रसायनांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर स्पष्टीकरण देताना मंत्र्यांनी सांगितले की, भारतात सध्या अशा उत्पादनांवर सरसकट बंदी नाही. तथापि, विशिष्ट रसायनांच्या वापरावर तज्ज्ञ समित्यांमार्फत देखरेख ठेवली जात आहे. लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या या प्रकल्पाला राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाकडून रीतसर मंजुरी मिळालेली असून, २०२५ मध्ये प्रकल्पाच्या विस्तारवाढीसाठीही अतिरिक्त संमती देण्यात आली आहे.

दरम्यान, कंपनीने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत आपली कार्यपद्धती पारदर्शक असल्याचे म्हटले आहे. प्रकल्पाबद्दल केली जाणारी टीका दिशाभूल करणारी असून, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुरक्षा मानकांचे पालन करूनच उत्पादन घेतले जात असल्याचे कंपनीने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. या सरकारी स्पष्टीकरणामुळे गेल्या काही दिवसांपासून या प्रकल्पाबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!