मुख्य बातमी

कोतवडे येथे मनोरुग्ण तरुणाची विहिरीत उडी मारून आत्महत्या

रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे उंबरवाडी येथील एका ३२ वर्षीय तरुणाने मानसिक आजाराच्या भरात विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साईनाथ नारायण बारगोडे असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साईनाथ बारगोडे हा गेल्या काही काळापासून मानसिक आजाराने ग्रस्त होता. त्याच्यावर रत्नागिरीतील मनोरुग्णालयात डॉ. पेवेकर यांच्याकडे औषधोपचार सुरू होते. आजारपणामुळे तो अनेकदा कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून जात असे. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास त्याने अचानक घराशेजारील विहिरीत उडी मारली. ही बाब निदर्शनास येताच त्याला तातडीने विहिरीबाहेर काढून उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच सायंकाळी ६:३० वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.

या घटनेबाबत १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२:२० वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनोरुग्ण असलेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे कोतवडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!