दाभोळमध्ये २२ फेब्रुवारीपासून चंडिका देवस्थानच्या शिमगोत्सवाला सुरुवात

दापोली : तालुक्यातील दाभोळ या कुंभार वाडीतील ग्रामदेवता चंडिका मंदिर देवस्थान ट्रस्टच्या शिमगोत्सव २२ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. शिमगोत्सवावर चर्चा विनिमय करण्यासाठी देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष नरेश साळवी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच सभा झाली. या सभेला ग्रामस्थ मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
२२ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता रूपे चढविणे, चंडिका मंदिर देवस्थान पासून नरवणकर, गणपती मंदिर असा कार्यक्रम असून घरे घेण्यासाठी पालखी २३ फेब्रुवारी रोजी त्या त्या वॉर्डनुसार रवाना होणार आहे. यावर्षी दिवस कमी मिळत असल्याने पालखीच्या वॉर्ड मध्ये थोडासा बदल करण्यात आलेला आहे.
२ मार्च रोजी रात्री १२ नंतर होम लावण्यात येणार आहे. ३ मार्च रोजी दुपारी २ वाजता सहाणा भरणे व सत्यनारायण महापूजा, ४ मार्च रोजी दुपारी २ वाजल्यापासून गावात धुलिवंदन, तर ८ मार्च रोजी दाभोळ गावात रंगपंचमी साजरी करून दाभोळ शिमगोत्सवाची सांगता होणार आहे.



