मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

समुद्रातून स्फोटासारख्या आलेल्या आवाजामुळे नागरिक भयभीत 

नाटे परिसरातील घटना : अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन 

राजापूर : तालुक्यातील माडबन विजयदुर्ग ते नाटे परिसरात शनिवारी रात्री समुद्रात मोठ्या स्फोटासारखे आवाज ऐकू आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये काही काळासाठी भीतीचे वातावरण पसरले होते; मात्र हे आवाज खोल समुद्रात जाणाऱ्या टग म्हणजेच मोठ्या बोटीवरून सिग्नल पिस्टलमधून फायर केल्याचे समोर आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. दरम्यान, या घटनेमुळे भयभीत झालेल्या नागरिकांमध्ये अनेक अफवा पसरल्याने पोलिसांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. या आवाजाबाबत आधी मिसाईल फायर केल्याचा गैरसमज प्रत्यक्षदर्शी मच्छीमाऱ्यांचा झाला आणि त्यातून अफवा पसरवण्यात आली.

शनिवारी रात्री ९.३० ते १० वाजण्याच्या सुमारास माडबन आणि विजयदुर्ग येथील खोल समुद्रात साधारपणे २० नॉटिकल माईल अंतरावरून काही स्फोटासारखे आवाज नागरिकांना ऐकू आले होते. या आवाजांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणात पसरले होते. याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती मिळताच पोलिसांनी त्या ठिकाणी ड्रोन पेट्रोलिंग केली. तटरक्षक दलाकडील (कोस्टगार्ड) नौकांनीही त्या परिसरात पेट्रोलिंग केले. तसेच मुंबईहून कोस्टगार्डची इंटरसेप्टर नौकाही त्या ठिकाणी वळवण्यात आली होती.

रविवारी सकाळी कोस्टगार्डकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्या समुद्रातून एक टग जात होते. त्या टगने ३ ते ४ वेळा सिग्नल फायर केले होते; परंतु, त्यावेळी समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना समुद्रात मोठे आवाज ऐकू आल्याने त्यांचा मिसाईल फायर होत असल्याचा गैरसमज झाला. तशा अफवाही या परिसरात पसरली होती. मात्र घटनेची शहानिशा केल्यानंतर वेगळीच वस्तुस्थिती समोर आली. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही गैरसमजांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा पोलिस दलाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!