एम. देवेंदर सिंग यांच्यासह दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचे निलंबन

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनातून एक मोठी प्रशासकीय कारवाई समोर आली आहे. सभागृहात माहिती न दिल्याच्या गंभीर कारणावरून दोन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. गुरुवारी तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली असून पर्यावरण विभागाने निलंबनासंदर्भातील फाईल्स मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्याची माहिती आहे. आयएएस अधिकारी एम. देवेंदर सिंग आणि सतीश पडवळ यांच्या निलंबनाची प्रक्रिया औपचारिकरित्या पुढे नेण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर येथील एका आमदाराने पर्यावरणविषयक प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. या प्रश्नाला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की संबंधित अधिकाऱ्यांना आधीच सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्यांनी आवश्यक ब्रिफिंग दिली नाही. वारंवार बोलावूनही ते अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, असेही त्यांनी सभागृहाला सांगितले.
या प्रकाराची गंभीर दखल घेत तालिका अध्यक्ष दिलीप लांडे यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य-सचिव असलेले आयएएस अधिकारी एम. देवेंदर सिंग तसेच सहसंचालक सतीश पडवळ यांच्या निलंबनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्याबाबतची फाईल पर्यावरण विभागाकडून मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आली आहे.
“अधिकारी जर सभागृहाला माहिती देत नसतील आणि सहकार्य करत नसतील, तर तो सर्व आमदारांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा अपमान आहे. अधिकारी कितीही वरिष्ठ असला तरी त्याला त्याची जबाबदारी जाणवून देणे हे सभागृहाचे कर्तव्य असल्याचे दिलीप लांडे यांनी स्पष्ट केले.



