मुख्य बातमी

डी. जे. सामंत महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न

पाली (रत्नागिरी) : येथील डी. जे. सामंत महाविद्यालयामध्ये तृतीय वर्ष कला व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष महेश सामंत, प्रमुख पाहुणे राजेंद्रप्रसाद मसुरकर, आबलोली (ता. गुहागर) येथील गारवा कृषी पर्यटन केंद्राचे सचिन कारेकर, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कांता कांबळे, इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका नूतन कांबळे, सचिन सावेकर, संदेश चव्हाण, प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते.

सदिच्छा समारंभाचे अध्यक्ष व संस्थेचे उपाध्यक्ष महेश सामंत यांनी जे विद्यार्थी महाविद्यालयातून उच्चशिक्षण घेऊन बाहेर पडतील त्या विद्यार्थ्यांनी समाजामध्ये आदर्शव्रत कार्य करण्याचे आवाहन करतानाच विद्यार्थ्यांनी ओळख निर्माण करावी, स्वतःचा गौरव, आपल्या आई-वडिलांचा गौरव आणि त्याच बरोबर महाविद्यालयाचाही गौरव होईल अशा प्रकारचे कार्य विद्यार्थ्यांकडून घडावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली व पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

 

तृतीय वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभाला राजेंद्रप्रसाद मसूरकर यांनी करिअरविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे की जेणेकरून महाविद्यालयाचा विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत होऊ शकेल, असे सांगितले.

या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे, गारवा कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सचिन कारेकर यांनी सरकारी नोकरी बरोबरच आपल्या कोकणातील निसर्ग सौंदर्याचा फायदा घेऊन जास्तीत जास्त लोकांना कोकणात पर्यटक म्हणून येण्यासाठी प्रवृत्त करावे. यातून रोजगाराची मोठी संधी आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होऊ शकेल, असे मत व्यक्त केले.

सदिच्छा समारंभाच्या निमित्ताने डी. जे. सामंत महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केलेले व वेगवेगळ्या सरकारी नोकरीमध्ये कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातल सर्वोच्च पदवी पीएच.डी. प्राप्त केलेला व प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेला महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी गुरुप्रसाद घाडी, रेल्वेमध्ये टीसी पदावर कार्यरत असलेला सचिन सावेकर व संदेश चव्हाण, पोलीस खात्यात कर्तव्य बजावत असलेला राजेंद्र शिंदे या माजी विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये आपल्या जडणघडणीमध्ये महाविद्यालयाचा मोठा वाटा असल्याचे मनोगत व्यक्त केले. शिक्षण पूर्ण करून आता स्पर्धेच्या जगात येणाऱ्या या विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श समोर रहावा व त्यांना देखील अशा पद्धतीने काम करण्याची प्रेरणा मिळावी संस्थेचा हाच उद्देश या विद्यार्थ्यांच्या सत्कारामागे होता.

या कार्यक्रम प्रसंगी श्री. राजेंद्रप्रसाद मसुरकर लिखित “भाषांतर : कौशल्य आणि शास्त्र” या पुस्तकाचे प्रकाशन गारवा कृषी पर्यटन केंद्रांचे संचालक सचिन कारेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

तृतीय वर्ष कला व वाणिज्य शाखेच्या सदिच्छा समारंभानिमित्त विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यामध्ये महाविद्यालयाचा जीएस पूर्वेस तांदळे, विद्यार्थिनी प्रतिनिधी सृष्टी सरफरे, द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी सिमरन सावंत, प्रथम वर्ष कला शाखेचा पारस शिंदे यांचा समावेश होता. या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयात विविध विभागांच्यावतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जडणघडण होत असल्याचे सांगितले. महाविद्यालयात शिक्षणाबरोबरच विविध विभागांच्या माध्यमातून विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कला गुण विकसित झाल्यामुळे समाजात वावरताना आत्मविश्वास निर्माण झाल्याचे मत विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

आजच्या या सदिच्छा कार्यक्रमामध्ये महिला विकास कक्षाकडून घेण्यात आलेल्या “राखी मेकिंग” या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी बनवलेल्या राख्या पाली बाजारपेठेत विक्री करून आलेल्या रकमेतून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सदिच्छा म्हणून पेन वाटप करण्यात आले. याच लेखणीतून त्यांनी आपल्या आयुष्याला योग्य आकार द्यावा हा संस्थेचा हेतू होता.

डी. जे. सामंत महाविद्यालयात आयोजित या समारंभाचे प्रास्ताविक डॉ. कांता कांबळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रथम व द्वितीय वर्ष कला व वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!