डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये महिला दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : तालुक्यातील पाली येथील श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी संचालित डी. जे. सामंत इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये १७ मार्च रोजी ‘जिद्द – जागर स्त्री शक्तीचा’ कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला. महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित या कार्यक्रमातून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला.
स्त्री-पुरुष समानता ही काळाची गरज असून महिलांच्या अंगी असलेल्या जिद्द आणि कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार जाधव आणि पोलीस हवालदार दीपिका सवाई राम उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर डॉ. पद्मजा कांबळे यांनी ‘सुजाण पालकत्व, बदलती जीवनशैली व आजार’ या विषयावर पालकांशी संवाद साधत आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून दिले. ॲड. सुयोग कांबळे यांनी ‘कायदा व सुव्यवस्था’ या विषयावर मार्गदर्शन करत महिला व बालकांशी संबंधित कायदेशीर बाबींची माहिती दिली.

आपल्या मनोगतात डॉ. कांबळे यांनी शाळेच्या आणि संस्थेच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे भरभरून कौतुक केले. पालकांसाठी अशा माहितीपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी शाळेबद्दल अभिमान व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आणि पाककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण अमित कदम यांनी केले. महिलांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन देणाऱ्या पाककला स्पर्धेचे परीक्षण गिरीश शीतप यांनी केले.
दोन्ही परीक्षकांनी आपल्या भाषणातून शाळेची शिस्त, नेटके नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रेया गोसावी आणि सौ. स्नेहल भागवत यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. मुख्याध्यापिका सौ. नूतन कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक पालक संघ सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशासाठी परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र (अण्णा) सामंत आणि संचालिका स्वरूपा सामंत यांच्या प्रेरणेतून पार पडलेल्या या कार्यक्रमाचे पालकांनी उत्स्फूर्त स्वागत केले.



