अकरा ग्रामपंचायतींचा ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ विरोधात ठराव

खेड : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात परिसरातील ११ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत कारखाना बंद करण्याच्या मागणीबाबत ठराव मंजूर केले आहेत. तसे निवेदन एकत्रितपणे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
खेड तालुक्यातील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल लिमिटेड कंपनीविरोधात बुधवारी प्रमुख आंदोलकांनी रत्नागिरी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन पुढील भूमिका स्पष्ट केली. या बैठकीत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देत, कंपनी बंद होईपर्यंत संविधानिक व लोकशाही मार्गाने लढा सुरू ठेवणार असल्याचे आंदोलकांनी ठामपणे सांगितले.
या वेळी परिसरातील लोटे, चिरणी, आंबडस, भेलसई, सोनगाव, धामणदिवी, कालुस्ते बुद्रुक, घाणेखुंट, आवाशी, गुणदे, शेल्डी या ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, सर्व सदस्य आणि प्रमुख व्यक्ती उपस्थित होते. या ११ ग्रामपंचायतींनी मिळून “लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती” नावाने ४५ नागरिकांची समिती गठित केली असून त्यांनी प्रशासनासमोर स्थानिक नागरिकांच्या भावना मांडत कंपनीमुळे होणाऱ्या परिणामांविषयी सविस्तर चर्चा केली.
दरम्यान, १८ मार्च रोजी या संदर्भात रत्नागिरी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना विविध ग्रामपंचायतींच्या ठरावांसह निवेदन सादर करण्यात आले. धामणदेवी, आंबडस, भेलसई, लोटे, गुणदे, आवाशी, चिरणी, घाणेखुंट, सोनगाव, कालुस्ते बुद्रुक आणि शेल्डी अशा एकूण अकरा ग्रामपंचायतींनी एकमुखाने ठराव मंजूर करून कंपनीविरोधात भूमिका घेतली आहे.
सर्व ग्रामपंचायतींनी एकत्र येत, “जनतेच्या हितासाठी आणि न्यायासाठी हा लढा कंपनी बंद होईपर्यंत सुरू ठेवणार,” अशी थांब भूमिका घेतली आहे. स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या या विरोधामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, पुढील काळात या आंदोलनाची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल कंपनीमार्फत घातक ‘पिफास’चे उत्पादन घेत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही कंपनी बंद करावी या मागणीसाठी गेले कित्येक दिवस कोकण नागरी संघर्ष समिती मार्फत कंपनीच्या गेट समोर धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनालाही अकरा ग्रामपंचायतीच्या या भूमिकेमुळे मोठा पाठींबा मिळाला आहे.


