मुख्य बातमी

रत्नागिरी वन विभागाची ‘सुवर्ण’ कामगिरी

रत्नागिरी : वनसंपत्तीचे संरक्षण व संवर्धनाचे प्रभावीपणे काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधेर्ये वाढविण्यासाठी त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यस्तरावर पदक बहाल करत गौरविण्यात येते. रत्नागिरीच्या विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई, वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांना सन २०२३-२४ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठी सुवर्णपदक, तर वनरक्षक अरविंद मांडवकर यांना रजत पदक जाहीर करण्यात आले आहे.

महसूल व वन विभागाने काल (२५ मार्च) याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. श्रीमती देसाई ठाणे वन विभागात कार्यरत असताना २०२३ अखेर त्यांनी ३० हून अधिक बिबट्यांची सुटका केली. जवळपास २०० हून अधिक अन्य वन्य प्राण्यांची सुटका केली आहे. अवैध तस्करी प्रकरणी ५० हून अधिक वाहने सरकारी जमा केली आहेत. पडघा येथील त्यांची खैर तस्करी कारवाई मोहीम विशेष गाजली. वन्य प्राणी विशेषत: बिबट्या या विषयी त्यांनी जनजागृती मोहीम राबविली आहे. या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, त्यांना सुवर्ण पदक जाहीर केले आहे.

त्याचबरोबर वनपाल सुरेश उपरे, रामदास खोत यांनाही त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सुवर्ण जाहीर झाले आहे. तसेच वनरक्षक श्री. मांडवकर यांना रजत पदक राज्य शासनाने जाहीर केले आहे. लवकरच राज्यस्तरीय पदक निवड समितीच्या शिफारशीनुसार या अधिकाऱ्यांना पदके देऊन गौरविण्यात येणार आहे. या बाबीची नोंद संबंधित विभाग प्रमुख, कार्यालयीन प्रमुखांनी त्यांच्या सेवापुस्तकात घेण्याबाबतही म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!