मुख्य बातमी

मठ येथील लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव २८ मार्चपासून

लांजा : तालुक्यातील मठ येथील श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथाचा ११०वा चैत्रोत्सव येत्या शनिवारपासून (२८ मार्च) सुरू होत असून, तो २ एप्रिलपर्यंत चालणार आहे. नव्या मंदिराच्या प्रांगणातील हा चौदावा उत्सव असून, या वर्षीच्या चैत्रोत्सवाची संपूर्ण सेवा ठाण्यातील सौ. विलासिनी आणि श्री. विलास मनोहर तांबे आणि कुटुंबीय करणार आहेत.

चैत्र शुद्ध दशमी शके १९४८ अर्थात शनिवार, २८ मार्चपासून पौर्णिमेपर्यंत म्हणजेच २ एप्रिलपर्यंत धार्मिक, पारंपरिक आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी हा वार्षिक चैत्रोत्सव साजरा होणार आहे. दररोज पूजा, अभिषेक, लघुरुद्र, कीर्तन, गायन, नामजप आणि यागादी कार्यक्रमांचा त्यात समावेश आहे. तीन एप्रिलला पहाटे लळिताचे कीर्तन होऊन उत्सवाची सांगता होईल.

पहिल्या दिवशी, २८ मार्च रोजी दुपारी ३ वाजल्यापासून श्रींची चतुःषष्टी राजोपचार पूजा होईल. रात्री ९ ते १०.३० या वेळेत स्थानिक कलाकार गायनसेवा करणार असून, रात्री १०.३० वाजल्यापासून स्थानिक कलाकारांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम होणार आहेत. २९ मार्च ते दोन एप्रिलपर्यंत दररोज सकाळी ८ ते दुपारी २.३० वाजेपर्यंत पूजा, अभिषेक, आरती, मंत्रपुष्प आणि महाप्रसाद होईल. याच वेळेत २९ मार्चला सौरयाग, ३० मार्चला रुद्र स्वाहाकार, ३१ मार्चला गणेशयाग/नवचंडी, १ एप्रिलला विष्णुयाग, तर २ एप्रिलला दत्तयाग होणार आहे.

२९ मार्च ते १ एप्रिल या कालावधीत दररोज रात्री ९ ते १२ या वेळेत पुण्यातील ह.भ.प. मकरंदबुवा सुमंत रामदासी यांची कीर्तने होणार असून, ३ एप्रिलला पहाटे ४ वाजता ह.भ.प. अमेयबुवा गुण्ये रामदासी यांचे लळिताचे कीर्तन होईल. दररोज सायंकाळी ७.३०नंतर आरत्या आणि नामजप, रात्री १२ वाजल्यानंतर भोवत्या आणि छबिन्याचा कार्यक्रम होईल. २९ मार्चला सायंकाळी ७.३० ते ८ या वेळेत मंत्रजागर केला जाणार आहे. ३१ मार्चला सायंकाळी ५ ते ७ या वेळेत महालक्ष्मी कुंकुमार्चन आणि हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होणार आहे. २ एप्रिल रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

२ एप्रिलला रात्री ९.३० ते १२ या वेळेत अजिंक्य पोंक्षे यांचा संगीतरजनी हा कार्यक्रम होणार आहे. अभंग, भक्तिगीते आणि नाट्यगीतांच्या या मैफलीला सुशील गद्रे (हार्मोनियम), विश्वास (राजू) जोशी (तबला) आणि कैलास दामले (पखवाज) यांची साथसंगत लाभणार आहे. हेच कलाकार कीर्तनालाही साथसंगत करणार आहेत.

उत्सवकाळात याग करण्यासंदर्भात अभय देवस्थळी (9421188139) आणि दीपक भाट्ये (9423875453) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच, श्रींची पूजा, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम आणि अधिक माहितीसाठी श्रेयस मुळ्ये (9405917567, 9028745038) किंवा उमेश आंबर्डेकर (9423292437) यांच्याशी संपर्क साधावा. वार्षिक चैत्रोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन श्रीदेव लक्ष्मीपल्लीनाथ संस्थानाचे अध्यक्ष मंदार हळबे, उपाध्यक्ष श्रीनिवास गुण्ये, चिटणीस नंदकुमार नेवाळकर आणि खजिनदार श्रेयस मुळ्ये यांनी केले आहे. सध्या भक्तनिवासाचे बांधकाम सुरू असून त्यासाठी भाविकांनी यथाशक्ती आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!