मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

२१ कोटींच्या निधीतून तीन पूल; चिपळूण–संगमेश्वरच्या विकासाला गती

चिपळूण : चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघातील दळणवळणाच्या समस्या सोडविण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, केंद्रीय मार्ग निधी (CRF) अंतर्गत तीन पुलांच्या बांधकामासाठी एकूण २१ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यालाच यश आले आहे.

संगमेश्वर तालुक्यातील कासार कोळवण येथील रा.मा. १६६ वांझोळे–कासार कोळवण–बोंड्ये ते रा.मा. १७४ या मार्गावरील बावनदीवरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या पुलाच्या बांधकामासाठी ६.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यामुळे या भागातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्याचप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले येथील प्र.जि.मा. ४६ ते हेदली-अणदेरी-कारभाटले प्र.जि.मा. ४७ या मार्गावर कि.मी. ०/९०० येथे शास्त्री नदीवर ७२ मीटर लांबीच्या पुलाच्या बांधकामासाठी ६.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या पुलामुळे परिसरातील गावांमधील अंतर कमी होऊन नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे.

तसेच चिपळूण तालुक्यातील दळवटणे येथील खांदाट–दळवटणे–मोरवणे मार्गावरील प्र.जि.मा. २७ कि.मी. १/०० येथील पुलाच्या पुनर्बांधणीसाठी ८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या कामामुळे स्थानिकांसाठी सुरक्षित आणि अखंड वाहतूक व्यवस्था उपलब्ध होणार आहे.

या तिन्ही कामांसाठी स्थानिक नागरिकांनी केलेल्या मागण्यांचा विचार करून आमदार शेखर निकम यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच अधिवेशनात वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून या कामांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!