मुख्य बातमी

रत्नागिरीतील डॉ. अक्षय फाटक यांच्या सायबर सुरक्षा रामकवचाला उत्तम प्रतिसाद

रत्नागिरी : आजच्या युगात आवश्यक असलेल्या ‘सायबर सुरक्षा’ या विषयाची रामनामाशी सांगड घालण्याचा अनोखा प्रयोग रत्नागिरीतील तरुण डॉ. अक्षय फाटक यांनी केला आहे. त्यांनी सायबर सुरक्षा रामकवच लिहिले असून, राष्ट्रीय कीर्तनकार विद्यावाचस्पती हभप चारुदत्तबुवा आफळे यांनी आपल्या रसाळ वाणीतून ते सादर केले आहे. रामनवमीच्या (२६ मार्च) मुहूर्तावर यू-ट्यूबवर प्रसारित करण्यात आलेल्या या रचनेला उत्तम प्रतिसाद मिळाला असून, अक्षय्य तृतीयेपर्यंत (१९ एप्रिल) त्याला ९२००हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओची लिंक शेवटी दिली आहे.

‘कीर्तनसंध्या-रत्नागिरी’ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकार झाला असून, सायबर संस्कार आणि सायबर सुरक्षा यांसारखे अत्यंत महत्त्वाचे विषय रामभक्तीच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत. आधुनिक काळातील सायबर धोके आणि त्यावरील उपाय यांबद्दल जागृती करण्यासाठी पारंपरिक कीर्तन शैलीचा प्रभावी वापर करण्याचा हा एक अभिनव प्रयत्न ठरला आहे. डॉ. अक्षय फाटक यांनी सायबर सुरक्षा या विषयात बरेच काम केले असून, सायबर संस्कार हा कार्यक्रमही ते सादर करतात.

व्हिडिओचे संपादन चिन्मय जोशी यांनी केले असून, सादरीकरण अधिक आकर्षक आणि परिणामकारक बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. तसेच या उपक्रमासाठी सौ. शुभांगी आफळे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

रामभक्तीच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, विविध स्तरांतून त्याचे कौतुक केले जात आहे. पारंपरिक संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाफ साधणारा “रामाचा जयजयकार” हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

लिंक : https://youtu.be/Sbf0xs1aQL4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!