मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

तुरळ येथे विहिरीत पडलेल्या गवारेड्याला वाचवण्यात वनविभागाला यश

संगमेश्वर : तालुक्यातील मौजे तुरळ हरेकर वाडी म्हाताऱ्याचं कोंड या ठिकाणी २० एप्रिल रोजी २० फूट खोल विहिरीत पडलेल्या गव्याला वाचवण्यात वन विभागाला यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २० एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजता विष्णू हरडे यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये गवारेडा पडल्याची माहिती तुरळचे पोलीस पाटील यांनी वनविभागाला दिली. त्यानुसार परिमंडळ वन अधिकारी संगमेश्वर देवरुख व सर्व स्टाफ मिळून आवश्यक साहित्यासह प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. विहीर ही सुमारे २० फूट खोल असून, यात अंदाजे दीड वर्षे वयाचा एक रानगवा पडल्याचे आणि त्याला विहिरीबाहेर पडता येत नसल्याचे दिसून आले. परिस्थितीची पाहणी केल्यानंतर या विहिरीला एका बाजूने जेसीबीच्या सहाय्याने वाट ( रॅम) तयार करून विहिरीत अडकलेल्या रानगव्याला मोकळी वाट करून देण्यात आली. सुमारे सहा तासानंतर तयार केलेल्या मार्गावरून रानगवा दुपारी ३-३० वाजण्याच्या सुमारास बाहेर काढण्यात आले. त्यानंतर हा रानगवा जंगलाच्या दिशेने नैसर्गिक अधिवासात निघून गेला.

हे रेस्क्यू ऑपरेशन विभागीय वन अधिकारी रत्नागिरी चिपळूण गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड, परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर देवरुखचे वनपाल सागर गोसावी, आरवलीचे वनरक्षक सुरज तेली, फुणगूसचे वनरक्षक आकाश कडुकर, दाभोळेच्या वनरक्षक श्रीमती सुप्रिया काळे, साखरपाचे वनरक्षक सहयोग कराडे यांनी केली. यावेळी स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संखेने ग्रामस्थ उपस्थित होते. त्यांचेही सहकार्य रेस्क्यू ऑपरेशनसाठी लाभले.

अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणी सापडल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक १९२६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने परिमंडळ वन अधिकारी (संगमेश्वर देवरुख) सागर गोसावी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!