आर्टिकल

साहित्यातील नवा विचार : पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

आपले स्वतःचे जीवन जगत असताना काही माणसे ही प्रवाहाच्या सोबत चालणारी असतात, तर काही माणसे प्रवाहाच्या विरोधात जाऊन काम करणारी असतात आणि काही माणसे यापेक्षा वेगळी म्हणजे स्वतः एक चैतन्यमयी खळाळता प्रवाह असतात. त्या चैतन्यमयी खळाळत्या प्रवाहात ते आपल्यासोबत नवीन विचारांशी एकनिष्ठ असणारी आणि त्यावर चालणारी माणसे निर्माण करत असतात. असा प्रवाह निर्माण करणाऱ्या महनीय व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक अर्थात सर्वांचे लाडके आदरणीय मधुभाई. शालेय वयापासून स्वतःचे स्वतंत्र मत व्यक्त करत, सर्वसामान्य लोकांच्या वेदना आणि भावना आपल्या लेखणीच्या माध्यमातून विविध साहित्यकृती निर्माण करणारे मधुभाई हे वयाच्या ९६ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे या वयातही ते सर्वांसाठी उर्जादायी आहेत.
मुळात कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करूळ सारख्या अत्यंत ग्रामीण भागात त्यांचे बालपण गेल्यानंतर, त्याच ठिकाणी आपले शालेय शिक्षण पूर्ण करत, मधुभाई यांनी आपल्यातील नवप्रतिभेच्या माध्यमातून साहित्य विश्वात नवीन निर्मिती केली. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, त्याप्रमाणे त्यांच्यातील साहित्यिक प्रतिभा ही अगदी लहान वयातूनच साकारली जात होती. वयाच्या १४ व्या वर्षी त्यांची पहिली कविता प्रसिद्ध झाली. तेव्हापासून सातत्याने अनेक विषयांवर लेखन केले. अनेक पुस्तके प्रकाशित झाली आणि वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांची पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. म्हणजेच मागील तब्बल ८० वर्षे नव्या उर्जेसह ते सातत्याने विविध विषयांवर लेखन करत आहेत. आणि त्या लेखनातून सामाजिक बदलाच्या चळवळीत मोठे योगदान देत आहेत. त्यांचे हेच योगदान साहित्य क्षेत्रात नवीन विचारांचा उगम ठरत आहे. म्हणूनच त्यांना मराठी साहित्यातील नवा विचार असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. साहित्यातील नवा विचार असे म्हणण्यामागे अनेक कारणे आहेत. त्यापैकी काही पुढीलप्रमाणे …

1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी फक्त एक वर्षाचा कार्यकाळ भूषविला. हा कार्यकाळ फक्त भूषविला नाही, तर त्या एका वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी साहित्य आणि साहित्य चळवळ वृंद्धीगत करण्यासाठी ठोस पावले उचलत उपाययोजना केल्या. त्यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संपूर्ण महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक, कार्यरत असणाऱ्या विविध साहित्यसंस्था, साहित्य मंडळे, साहित्य चळवळी यांच्याशी चर्चा केली. त्यातून त्या संस्थांचे व त्यांच्या कामकाजाचे सूक्ष्म निरीक्षण करत, त्या निरीक्षणातून त्यांच्या असे लक्षात आले की, साहित्याची प्रतिभा ही कोकणात मोठ्या प्रमाणात असतानाही त्यांना हक्कांचे व्यासपीठ नाही. त्यामुळे त्यांना व्यक्त होण्याची संधी इतरांच्या तुलनेने कमी मिळत आहे. म्हणून त्यांनी खुप विचारांती कोकणात सर्वप्रथम दौरा केला, अनेकांशी चर्चा केली आणि कोकण मराठी साहित्य परिषदेची स्थापना केली. परिणामी कोकणातील सर्वच जिल्ह्यातील लोकांना व्यक्त होण्याची मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली. आज विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेकांना कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून हक्कांचे व्यासपीठ उपलब्ध झाले. यामुळे कोकणातील मराठी साहित्यिक, लेखक, कलाकार, आणि साहित्यप्रेमी यांना व्यासपीठ मिळालेले आहे. मिळावं, त्यांच्या साहित्याचा प्रसार व्हावा यासाठी मधु मंगेश कर्णिक यांनी ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ या संस्थेची स्थापना केली. ही संस्था आजही कोकण आणि महाराष्ट्रभर कार्यरत असून, अनेक साहित्य संमेलने, व्याख्यानमाला, ग्रंथप्रदर्शन आयोजित करते.

1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर मधुभाई यांनी आधुनिक मराठी कवितेचे जनक कवी केशवसुत यांच्या जन्मगावी भेट दिली. त्यांच्या घराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी त्याचवेळी मराठी साहित्यातील या जगमान्य कवींचे म्हणजेच कवी केशवसुत यांचे स्मारक उभारण्याची घोषणा केली. अनेकजण अनेक घोषणा करतात. आता तर सर्वसामान्य लोकांना घोषणा म्हटले की त्या घोषणेचे पुढर काय होते याची कल्पना असते; पण आदरणीय मधुभाईंनी अनेक अडचणीवर मात करत हे अग्निदिव्य पार केले. आणि आज अत्यंत अत्याधुनिक स्वरूपात हे स्मारक कार्यान्वित आहे. आज अखंड भारतातून या स्मारकास अनेक मराठी भाषा प्रेमी भेट देऊन या साहित्यस्मारकाचे कौतुक करत विविध दालनांची माहिती घेत असतात. या स्मारकामुळे मालगुंड आणि मालगुंड परिसराची ओळख जगभरात साहित्य क्षेत्रातील अग्रेसर गाव बनले आहे.

1. मराठी भाषा ही मागील अनेक वर्षांपासूनची प्राचीन काळापासून चालत आलेली भाषा म्हणून तिचा उल्लेख आहे. असे असतानाही शासन दरबारी मराठी भाषेला राजमान्यता नव्हती. म्हणजेच तिला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला नव्हता. मधुभाई यांनी यासाठी समस्त मराठी भाषिकांना आवाहन केले आणि ऑगस्ट २०१९ मध्ये आझाद मैदान, मुंबई याठिकाणी खुप मोठे आंदोलन आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने उभारले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, शिक्षणात मराठी भाषा सक्तीची व्हावी, मराठी भाषा भवन उभारले जावे या व अशा अनेक मागण्या शासनाकडे त्यांनी मांडल्या. विशेष म्हणजे या कर्मयोगी व्यक्तिमत्वांचा स्पर्श या मागण्यांना झाला आणि त्यातील बऱ्याचशा मागण्या मान्य झाल्या. म्हणजे मराठी भाषा सक्तीची झाली, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. मधुभाई यांनी आयुष्यात सतत मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी साहित्य चळवळ वृंद्धीगत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले. त्यामुळे अनेक बाबी मराठी भाषेसाठी साध्य झाल्या.

1. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी केवळ कथा-कादंबऱ्यापुरते मर्यादित न राहता विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केलं आहे. मधुभाई यांनी सजीव निसर्ग, कोकणचा माणूस, ग्रामीण संस्कृती आणि जीवनाच्या साध्या पण हृदयस्पर्शी अनुभवांवर आधारित अनेक ललित लेख लिहिले. या सर्व लेखांमध्ये भाषेची सौंदर्यपूर्ण मांडणी आणि विचारांची जाण आहे. त्यासोबतच त्यांनी ‘शब्दांनो, मागुती या’ या काव्यसंग्रहात कोकणच्या निसर्गसौंदर्याचं, मानवी भावना आणि जीवनदृष्टीचं अत्यंत सुंदर वर्णन केले आहे.

1. कोकणातील अनेक ग्रामीण समस्या, सांस्कृतिक परंपरा आणि मराठी साहित्याच्या जडणघडणीसाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. महत्वाचे म्हणजे कोकणातले लोकजीवन, तिथली संस्कृती, तिथल्या माणसांचे प्रश्‍न आणि निसर्ग यांचा वारसा जपण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबवले. त्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, साहित्य संमेलने, साहित्य महोत्सव यांच्या आयोजनात पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचे कार्य हे साहित्यात सर्वांना दिशादर्शक ठरतात.

1. समाजात प्रबोधन घडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी सामाजिक प्रश्नांवर लेखन केलं. गावोगावी, कॉलेजांमध्ये आणि साहित्य संमेलनांतून निसर्ग संवर्धन, ग्रामीण विकास आणि सामाजिक ऐक्य यावर व्याख्यान देत लोकांमध्ये जाणीवजागृती निर्माण केली.

1. मला त्यांच्यातील अजून एक महत्वाचे वेगळेपण जाणवते. आपण सर्वजण किंवा विविध स्तरांवर महिला सक्षमीकरणाच्या गोष्टी करतो. त्यावर अनेकदा निवेदने व इतर माध्यमातून शासन दरबारी प्रयत्न केले जातात. मात्र राज्यस्तरांवर महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे यासाठी मधुभाई यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून मराठी साहित्यात पहिल्यांदाच राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलने सुरू केली. भव्य स्वरूपात होणाऱ्या या साहित्य संमेलनातून महिलांच्या संदर्भात अनेक विषयावर चर्चा घडवून आणली. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अंतर्गत सर्व महिलांना स्थान मिळवून देत ही साहित्य संमेलने यशस्वी केली.

1. तसेच युवकांनाही हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अंतर्गत युवाशक्तीची स्थापना केली आणि त्या माध्यमातून राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन यशस्वी केले. या युवा संमेलनातील सळसळत्या युवाना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळाल्याने ही संमेलन यशस्वी झाली.

1. मधुभाई यांनी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी साहित्य संमेलने यशस्वी केली. मागील वर्षी मॉरिशस याठिकाणी झालेले आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलने हे खऱ्या अर्थाने नव्या पिढीसाठी दिशादर्शक होते.

1. मधुभाई यांनी साहित्य चळवळी फक्त उभारल्या नाहीत तर त्यातून असंख्य नवसाहित्यिक निर्माण होतील यासाठी प्रयत्न केले. त्यांना प्रोत्साहन देत, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांना प्रेरणा दिली. यासाठी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्यिक व साहित्येत्तर पुरस्कार सुरू केले. अत्यंत काटेकोरपणे साहित्य प्रकाराची तपासणी करत योग्य व्यक्तींचा सन्मान केला. त्यामुळे लिहित्या हातांना प्रेरणा मिळाली. त्या हातांनी भविष्यात मोठे योगदान या चळवळीला दिले.
या व अशा अनेक कारणांमुळे मधुभाई हे स्वतंत्र विचारांचे ठरतात. त्यांचा विचार स्वतंत्र ठरतो. म्हणजेच साहित्यातील नवा विचार ठरतो.
आदरणीय मधुभाई यांचे कार्य पाहिले की, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुढील ओळी आठवतात…

जर तुम्हाला एका वर्षाची बिदागी हवी असल्यास, शेतीमध्ये धान्य पेरा !
जर तुम्हाला दहा वर्षांची बिदागी हवी असल्यास झाडे लावा,
जर तुम्हाला शंभर वर्षाची बिदागी हवी असल्यास, समाजात माणसे पेरा।
आणि
हजारो वर्षाची बिदागी हवी असल्यास, विचार पेरा।

आणि मला पूर्ण खात्री आहे की, मधुभाई यांनी याच हजारो वर्षासाठी समाजात हाच सकारात्मक विचार पेरत प्रबोधन केले आहे. म्हणूनच ते साहित्यातील विचार ठरतात. आज साहित्य चळवळीच्या निमित्ताने महाराष्ट्रातीलच नव्हे, तर अखंड भारतातील असंख्य साहित्यप्रेमी मधुभाई यांच्या कार्याने प्रेरित होऊन कार्यरत आहेत. त्यांच्या या सर्व कार्याची माहिती घेतली की, साहित्यातील आभाळाला स्पर्श करणारी उंची लक्षात येते. एवढे कार्य असूनही त्यांचे पाय जमिनीवर असतात. कधीही गर्व नाही, अहंकार नाही किंवा कुणाबद्दल द्वेष नाही. अत्यंत संयमाने ते सदैव स्वतः कार्यरत राहताना आम्हा सर्वांना प्रेरणा देत असतात.
अशा या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या सहवासात राहण्याचा मागील अनेक वर्षांपासून योग आलेला आहे. माझ्यासारख्या असंख्य लोकांना मधुभाईंनी सकारात्मक कार्य करण्याची प्रेरणा दिली. नवी ऊर्जा दिली. त्यांच्या याच प्रेरणेने प्रेरित होऊन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून सर्वजण कार्य करत असतात. त्यांचे हेच प्रोत्साहन आम्हांला सदैव मिळत राहते. ते भविष्यात सदैव मिळत राहावे.

– माधव विश्वनाथ अंकलगे,
मु. पो. वाटद खंडाळा, ता. जि. रत्नागिरी – ४१५६१३.
संपर्क – ९७६४८८६३४० / ९०२१७८५८७४.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!