रत्नागिरी पालिकेच्या नवीन सभागृहाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचे नाव
सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब

रत्नागिरी : नगरपालिकेचा कारभार आता जुन्या वास्तूतून नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित होत आहे. या नवीन इमारतीमधील भव्य सभागृहाला नक्की कोणाचे नाव दिले जाणार, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून शहरात उत्सुकता होती. अखेर या चर्चेवर आज (३० एप्रिल) पडदा पडला असून, सभागृहाचे नामकरण करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
आज झालेल्या नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सभागृहाच्या नामकरणाचा विषय मांडण्यात आला. यावेळी सर्व सदस्यांनी एकमुखाने या प्रस्तावाला संमती दिली. त्यानुसार नवीन सभागृहाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे.
यावेळी चर्चेत सहभागी होताना उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर यांनी एक महत्त्वाची सूचना मांडली. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाच्या प्रस्तावाचे आम्ही स्वागतच करतो, मात्र भविष्यात पालिकेच्या इतर उपक्रम किंवा वास्तूंना नामकरण करताना भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या नावांचाही सकारात्मक विचार केला जावा, असे त्यांनी यावेळी नमूद केले.



