
रत्नागिरी : शहराजवळील मिरजोळे, लक्ष्मीकांत वाडी येथे कोलगे किराणा दुकानाजवळ असलेल्या लाकडाच्या माचाखालील जाळीत एक बिबट्या अडकलेला असल्याची माहिती सागर कळंबटे तसेच गावचे माजी सरपंच गजानन गुरव यांनी सकाळी सुमारे ८.३० वाजता दूरध्वनीद्वारे वनपाल, पाली यांना दिली.
ही माहिती तत्काळ परिक्षेत्र वन अधिकारी, रत्नागिरी यांना कळविण्यात आली. त्यानंतर त्यांच्या समवेत घटनास्थळी जाऊन पाहणी करण्यात आली असता परिसरात ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आढळली. ग्रामस्थांना सुरक्षित अंतरावर हटवून पुढील कार्यवाही करण्यात आली.
घटनेची माहिती विभागीय वन अधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक, रत्नागिरी (चिपळूण) प्रियंका लगड यांना देण्यात आली. ग्रामस्थांनी जाळीत पकडून ठेवलेल्या बिबट्याला वन विभागाने सुरक्षित ताब्यात घेतले.
पशुधन विकास अधिकारी, मालगुंड येथील डॉ. स्वरूप काळे, डॉ. रानभरे यांच्या मार्फत बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून तात्काळ औषधोपचार सुरू करण्यात आले. तसेच बिबट्याला सुरक्षित ठिकाणी ठेवून आवश्यक आहार देण्यात येत आहे.
हा बिबट्या मादी जातीचा असून अंदाजे ६ ते ८ महिन्यांचा आहे. सध्या तो वन विभागाच्या निगराणीखाली असून त्याच्या नैसर्गिक अधिवासाचा शोध सुरू आहे.
या कार्यवाहीत परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार, परिमंडळ वनाधिकारी पाली एन. एस. गावडे, वनपाल (कांदळवन कक्ष) मिलिंद डाफळे, वनरक्षक विराज संसारे, शर्वरी कदम (जाकादेवी), प्राजक्ता चव्हाण, धनंजय यादव (आरे), चालक महेश धोत्रे, प्राणीमित्र ईशान खानोलकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरीजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत आढळल्यास वन विभागाच्या टोल-फ्री क्रमांक 1926 किंवा 9421741335 वर तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.



