२ डी इको कॅम्प मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ मुलांची तपासणी
उदय सामंत प्रतिष्ठानच्या वतीने आयोजन

रत्नागिरी : उदय सामंत प्रतिष्ठान, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य विभाग कर्मचारी, रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय या सर्वांच्या सहकार्याने आयोजित मोफत २ डी इको कॅम्पसाठी बालाजी हॉस्पिटल मुंबई येथील प्रसिद्ध पेडियाट्रिक कार्डिओलॉजिस्ट डॉ. श्रीपाल जैन यांची उपस्थिती लाभली. या कॅम्पमध्ये डॉ. जैन यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील ६७ मुलांची तपासणी केली.
या कॅम्पमध्ये १५ दिवसांच्या बाळापासून १५ वर्षांच्या मुलांची २डी इको तपासणी झाली. या तपासणीनंतर १८ मुलांसाठी पुढील उपचारासाठी पाठपुरावा करावा लागणार आहे आणि ८ मुलांवर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.
प्रतिष्ठानतर्फे पुढील उपचाराचे नियोजन करण्यात येणार आहे. कॅम्पला आलेल्या लहान मुलांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामनंदन आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप यांनी चॉकलेट वाटप केले. तसेच लहान मुलांना घेऊन आलेल्या पालकांसमवेत संवाद साधत मार्गदर्शन केले.
कॅम्पला आलेल्या सर्वांना प्रतिष्ठानतर्फे पाणी, नाश्ता, जेवण या सर्व सुविधा देण्यात आली. प्रतिष्ठानतर्फे लहान मुलांसाठीचे एकूण पाच २डी इको कॅम्प आयोजित केले गेले होते. ज्यामधून किमान ४५५ मुलांची तपासणी आणि ४१ सर्जरी करण्यात आल्या.



