आरोग्यमुख्य बातमी

कीटकजन्य रोगनियंत्रण उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यात वर्षभर कार्यक्रम

रत्नागिरी : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त (१६ मे) कीटकजन्य रोगनियंत्रण उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्ह्यामध्ये वर्षभर कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. त्याबाबत सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

“डेंग्यू हा विषाणूजन्य आजार, असून व्यक्तीला दूषित एडिस डासाची मादी चावल्याने त्याचा प्रसार होतो. डेंग्यू व इतर कीटकजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या घराभोवती व परिसरात स्वच्छता राखणे अत्यंत आवश्यक आहे. साचलेले पाणी हे डासांच्या उत्पत्तीचे मुख्य कारण असून ‘आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविल्यास डासांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. ग्रामपंचायत, आरोग्य यंत्रणा व नागरिक यांच्या संयुक्त सहभागातूनच कीटकजन्य आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळविता येईल,” असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये डेंग्यूचे २३९ रुग्ण, २०२४ मध्ये २५६ रुग्ण, तर २०२५ मध्ये ४२ रुग्ण आढळले होते. आरोग्य विभागाच्या प्रभावी उपाययोजनांमुळे या वर्षी हे प्रमाण कमी होऊन जानेवारी २०२६ पासून आजपावेतो ३ रुग्ण आढळून आले आहे, अशी माहिती जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संतोष यादव यांनी दिली आहे.

कीटकजन्य रोगावर प्रतिबंध करण्यासाठी कार्यक्षेत्रातील डास उत्पत्ती कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना : ग्रामपंचायतींनी आपल्या कार्यक्षेत्रातील डासअळी घनता कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपला परिसर स्वच्छ ठेऊन डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे, कायमस्वरूपी डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पीमासे सोडणे, पाणी साठवणुकीची भांडी रिकामी करून घासून पुसून कोरडी करून आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, गावामध्ये इको फ्रेंडली कार्यक्रमांतर्गत सर्व शौचालयाच्या व्हेंट पाईपला व आऊटलेटला जाळी बसविणे, परिसरातील प्लास्टीक, टायर्स, भंगार साहित्य इ. निरुपयोगी साहित्यांची विल्हेवाट लावणे, तुंबलेली गटारे वाहती करणे व डबकी बुजविणे.

या कार्यक्रमासाठी ग्राम आरोग्य पाणी पुरवठा व पोषण समिती यांचे तिमाही सभेमध्ये जनजागृतीबाबत विशेष सूचना देण्यात येऊन जनजागृती करणे, डासांच्या नियंत्रणासाठी ग्रामपंचयातीने गप्पी मासे पैदास केंद्रे तयार करणे, नियमित पाणी शुध्दीकरण करण्यात यावे. पाण्यामध्ये योग्य त्या प्रमाणात उत्तम प्रतिच्या टीसीएल पावडरचा वापर करणे, ग्रामस्थांनी पाणी उकळूण गाळून पिणे, आपल्या कार्यक्षेत्रामध्ये टायर अथवा भंगार व्यावसायिकांनी स्वच्छता पाळणे तसेच पावसाचे पाणी साठू न देण्याबाबत सूचित करणे, पावसाळयात डबक्यांमध्ये पाणी साठून तात्पुरती डासोत्पत्ती स्थाने निर्माण होतात. अशा ठिकाणी भर घालून ही डासोत्पत्ती स्थान नष्ट करणे अथवा गप्पी मासे सोडणे किंवा आळी नाशकाचा वापर करणे

संपूर्ण गावाचे सर्व्हेक्षण करून पॅरा कन्टेनर (टायर्स, फुटकी मातीची, प्लॅस्टिक ची भांडी) यांची यादी करून ग्रामपंचायतमार्फत त्यांची विल्हेवाट लावणे, गावातील शासकीय इमारत, पशुवैद्यकीय दवाखाना, खासगी दवाखाने, एसटी डेपो, रेल्वे स्टेशन या ठिकाणाचे सर्व्हेक्षण करून डासोत्पती स्थाने आहेत का याची नियमित पडताळणी करणे.

नागरिकांनी सहकार्य करून या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच राबविल्यास आपल्या भागातील डास व आळी घनता कमी होऊन किटकजन्य आजाराचा उद्रेक होणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!