मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरात बनावट विदेशी मद्य जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई

राजापूर : तालुक्यात गोवा राज्य निर्मित बनावट विदेशी मद्याची विक्री करणाऱ्यांविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सुमारे १ लाख ५ हजार ६७० रुपयांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले.

राज्य उत्पादन शुल्क (महाराष्ट्र राज्य, मुंबई) विभागाचे आयुक्त डॉ. राजेश देशमुख, संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली १३ मे रोजी ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने दोन पंचांसह मौजे सोलये गाव हद्दीत, राजापूर रेल्वे स्टेशन शेजारी असलेल्या घर क्रमांक ४०९ च्या मागील परिसरात छापा टाकला. या कारवाईदरम्यान गोविंद बुधाजी सौंदळकर (वय ५८, रा. सोलये, राजापूर रेल्वे स्टेशन रोड, ता. राजापूर) यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात गोवा राज्य निर्मित विदेशी मद्याचा साठा जप्त करण्यात आला.

जप्त केलेला मुद्देमाल असा : ५७ हजार ६०० रुपये किंमतीच्या १८० मिली मापाच्या बॉक्स ओडका विदेशी मद्याच्या ५७६ बाटल्या, २८ हजार ८०० रुपये किंमतीच्या हनी ब्लेंड विदेशी मद्याच्या २८८ बाटल्या, डीएसपी ब्लॅक विदेशी मद्याच्या ६ हजार १८० रुपये किंमतीच्या २८ बाटल्या, मॅकडॉल नं. १ या विदेशी मद्याच्या ५ हजार ६० रुपये किंमतीच्या २२ बाटल्या, ६५० मिली मापाच्या एलबी स्ट्राँग बीअरच्या ८ हजार ५० रुपये किंमतीच्या ४६ बाटल्या असा एकूण १ लाख ५ हजार, ६७० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गोविंद बुधाजी सौंदळकर यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या कलम ६५(३) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत निरीक्षक आर. जी. मोरे, जवान सुर्वे, जवान लोढे, जवान उबाळे तसेच महिला जवान श्रीमती घुडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!