विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी : जिल्हाधिकारी मनुज जिंदल

रत्नागिरी : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधान परिषद रायगड-तथा-रत्नागिरी-तथा सिंधुदूर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाकरिता निवडणूक कार्यक्रम १८ मे रोजीपासून घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून म्हणजेच १८ मेपासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत म्हणजेच २५ जूनपर्यंत रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पूर्ण क्षेत्रामध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत आचारसंहितेचा भंग होणार नाही याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. सार्वजनिक व खासगी मालमत्तेवर फलक, बॅनर लावून मालमत्ता विरूपित केल्यास अगर तशी तक्रार आल्यास मालमत्ता विरूपीकरण कायदा १९९५ चे कलम २ नुसार दंडनीय कारवाई करावी लागेल असे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी आदेशित केले आहे.
या निवडणुकीसाठी २५ मे रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची अंतिम मुदत १ जून असेल. २ जून रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी होणार असून ४ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकांसाठी मतदान १८ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत होणार आहे. मतमोजणी सोमवार २२ जून रोजी करण्यात येईल, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया २५ जूनपूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे.



