महाराष्ट्रमुख्य बातमी

राज्यावर उष्णतेसह पावसाचे संकट कायम

विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट : रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून राज्यातील अकोला, वर्धा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांत पुढील दोन दिवस उष्णतेची लाट कायम असणार आहे. गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर आणि गोदिंया या जिल्ह्यांमध्ये पुढील ५ दिवस उष्णतेची लाट असणार आहे; मात्र, दुसरीकडे रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अहिल्यानगर, सांगली, ठाणे, रायगड, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण असेल. हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

सध्या राज्यात दुहेरी वातावरण बघायला मिळत आहे. काही ठिकाणी पाऊस, तर काही ठिकाणी उष्णतेचा कहर असून, त्यात आजही भारतीय हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. गोंदिया जिल्ह्यात ४४ ते ४५ अंशावर तापमान आले असून वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघाताच्या घटना पुढे येत आहेत.

भंडारा जिल्ह्यात ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून, यंदाच्या उन्हाळ्यातील हा सर्वाधिक उष्ण दिवस ठरल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. प्रखर उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नागरिक लस्सी, लिंबू सरबत व अन्य शीतपेयांच्या दुकानांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. अकोला जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट कायम असून नागरिक अक्षरशः होरपळून निघत आहेत. दरम्यान, पुढील तीन ते पाच दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानाचा पारा सतत चढत असल्याने अकोला जिल्ह्यासाठी रेड अलर्ट होता. उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय दुपारच्या वेळेत घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!