मुख्य बातमी

हळदीच्या पिवळ्या रंगात दरवळला साहित्याचा सुवास!

अदिती मयेकर यांच्या ‘काव्यादिती’ काव्यसंग्रहाचे अनोख्या पद्धतीने प्रकाशन

रत्नागिरी : लग्नघरातील सनईचे मंगल स्वर, नातेवाईकांची लगबग, अंगाला लागलेला हळदीचा पिवळाधमक रंग आणि आनंदाने भरलेले वातावरण… अशा प्रसन्न क्षणी हर्चे (ता. रत्नागिर) एका आगळ्यावेगळ्या साहित्यिक सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली. ‘स्टेथोस्कोप’ पुरस्कारप्राप्त पुस्तकाचे लेखक डॉ. अनिकेत मयेकर यांच्या भगिनी अदिती अंजनी आनंदकुमार मयेकर यांच्या ‘काव्यादिती… कविता डायरीतल्या’ या प्रथम काव्यसंग्रहाचे प्रकाशन त्यांच्या हळदी समारंभात अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडले.

हळदीचा कार्यक्रम रंगात आला असतानाच अचानक काव्यसंग्रह प्रकाशनाची घोषणा करण्यात आली आणि नववधू अदिती यांच्या हातात त्यांच्या स्वतःच्या कवितांचे पुस्तक देण्यात आले. अंगावर हळदीचा रंग आणि हातात आपल्या भावना शब्दरूपात उमटलेले पुस्तक पाहताच अदिती यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले. उपस्थित नातेवाईक, ग्रामस्थ आणि साहित्यप्रेमींनीही या अनोख्या कल्पनेचे भरभरून कौतुक केले.

‘काव्यादिती’ हा अदिती मयेकर यांचा पहिलाच काव्यसंग्रह असून, त्याचे प्रकाशन सोनचाफा प्रकाशन यांनी केले आहे. या संग्रहामध्ये नातेसंबंधांची कोमल वीण, मनातील हळवे भावविश्व, स्वप्नांची नाजूक गुंफण आणि जीवनातील अनुभवांचे तरल शब्दचित्र वाचायला मिळते.

आपल्या बहिणीच्या लेखनाला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी डॉ. अनिकेत मयेकर यांनी घेतलेला पुढाकार उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय ठरला. साहित्यिक जाणीव आणि कौटुंबिक प्रेम यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यु. बी. पाटील यांनी आपल्या खुमासदार शैलीत केले. यावेळी डॉ. स्मिता अविनाश मयेकर यांच्यासह महाविद्यालयीन प्राध्यापक, हर्चे गावचे ग्रामस्थ तसेच दोन्ही कुटुंबातील नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर लग्नाचा आनंद आणि अदिती यांच्या साहित्यिक यशाचा अभिमान स्पष्टपणे दिसून येत होता.

लग्नसोहळा, हळदीचा उत्सव आणि काव्यसंग्रह प्रकाशन असा दुर्मीळ त्रिवेणी संगम अनुभवत उपस्थितांनी हा क्षण अविस्मरणीय ठरल्याची भावना व्यक्त केली. ‘काव्यादिती’ हा काव्यसंग्रह रसिकांच्या मनात निश्चितच खास स्थान निर्माण करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!