भारत विकास परिषद, स्कॉन प्रो फाउंडेशन आयोजित शिबिरात १७५ दिव्यांगाच्या हात, पायाचे मोजमाप

रत्नागिरी : भारत विकास परिषद दिव्यांग केंद्र (पुणे) आणि स्कॉन प्रो फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ स्कॉन प्रो यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत कृत्रिम पाय मोजमाप शिबिरात १७५ हून अधिक दिव्यांगांनी सहभाग घेतला. साळवी स्टॉप येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात हे मोजमाप शिबिर दिवसभर सुरू होते.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व नजीकच्या जिल्ह्यांतील अनेक दिव्यांग यावेळी उपस्थित होते. यात दिव्यागांच्या पाय, हाताचे शास्त्रशुद्ध रित्या मोजमाप घेऊन, मोल्ड बनवण्यात येत होता. पुढील महिन्यात हे उच्च दर्जाचे आधुनिक ‘मॉड्यूलर’ कृत्रिम पाय, हात सुपूर्द करण्यात येणार आहेत. वजनाने हलके आणि ऑटोफोल्ड सुविधा असलेले पाय बसवल्यानंतर व्यक्ती केवळ चालू, धावू, पोहू शकते. उडी मारणे, वाहन चालवणे आणि शेतीची कष्टाची कामेदेखील सहजपणे करू शकते.
उद्घाटन कार्यक्रमावेळी स्कॉनचे ज्येष्ठ संचालक सतीश चव्हाण, संचालक महेश मायदेव, रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक अप्पासाहेब पराडकर, भारत विकास परिषद दिव्यांग केंद्राचे विश्वस्त विनय खटावकर, विश्वस्त राजशेखर अभ्यंकर, बांधकाम व्यावसायिक अनिल चन्ने, रोटरी क्लब स्कॉनच्या सचिव अपूर्वा ब्राह्मणे, कंपनीचे जनसंपर्क अधिकारी राहुल पुरकर उपस्थित होते. शिबिराचे समन्वयक ॲड. दीपक पटवर्धन यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
विनय खटावकर म्हणाले की, दिव्यांग म्हणजे परमेश्वर आहेत. त्यांच्या माध्यमातून नरसेवा म्हणजे नारायण सेवा करत आहोत. दिव्यांगांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. एक महिन्याने या दिव्यांगांना कृत्रिम पाय, हाताचे वितरण केले जाणार आहे. स्कॉन प्रो फाउंडेशनने सीएसआरचा निधी दिल्यामुळे हे काम सोपे झाले आहे. आज जे येऊ शकले नाहीत त्यांनी पुढील सहा महिन्यात आमच्या पुणे कार्यालयाशी संपर्क साधावा.
महेश मायदेव म्हणाले की, कोकण दिव्यांगमुक्त व्हावे, अशी स्कॉन प्रोजेक्टचे संस्थापक नीलेश चव्हाण यांची इच्छा आहे. श्री. चव्हाण हे मार्गताम्हाणे (गुहागर) गावचे सुपुत्र आहेत. आम्ही हे सलग चौथे शिबिर घेतले आहे. या माध्यमातून दिव्यांगांची सेवा करण्याचे काम करत आहोत.
शिबिरस्थळी दिव्यांग व सोबत आलेल्या व्यक्तीसाठी चहा, नाश्ता, जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांगांना कोणताही त्रास होऊ नये या करिता सुनियोजित व्यवस्थापन करण्यात आले होते. नोंदणी केल्यानंतर दिव्यांगांच्या हात, पायाचे मोजमाप घेण्यात येत होते. येथे भारत विकास परिषद, स्कॉन प्रो फाउंडेशन यासह रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी सर्वतोपरी मदत केली.
