मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरात पोलिसांकडून १३.५० लाखांच्या गोवा बनावटीच्या दारूसह दोन वाहने जप्त; तिघांना अटक

राजापूर : राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल १३ लाख ५० हजार २५६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत गोवा बनावटीच्या विदेशी दारूचा मोठा साठा आणि दोन वाहने जप्त करण्यात आली असून तीन आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही कारवाई २३ मे रोजी रात्री ९.१० वाजण्याच्या सुमारास कोदवली येथील पहिल्या बस स्टॉप फाट्यावर करण्यात आली. राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अनिल लक्ष्मण केसकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २४ मे रोजी पहाटे १.२८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ६५ (अ) व (ई) नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अमोल लक्ष्मण चिंदकर (वय ३५), अमित धोंडू चिंदरकर (वय ३४) आणि प्रशांत प्रकाश पवार (वय २९, सर्व रा. कलमठ, गावडेवाडी, ता. कणकवली) यांना अटक केली आहे. आरोपी कोणतीही वैध परवानगी नसताना विक्रीच्या उद्देशाने दोन वाहनांतून गोवा बनावटीची दारू वाहतूक करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप (क्र. एमएच-०७-एजे-५०७५) आणि एक गोल्डन रंगाची इनोव्हा कार (क्र. एमएच-४३-व्ही-२८२९) या वाहनांचा समावेश असून दोन्ही वाहनांची एकत्रित किंमत सुमारे १० लाख रुपये आहे.

तसेच गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला. यामध्ये ‘Golden ACE Blue Whisky’च्या ७५० मि.ली.च्या १७७६ सीलबंद बाटल्या, १८० मि.ली.च्या २५९२ बाटल्या, ‘Haywards Fine Whisky’च्या २४० बाटल्या, ‘McDowell’s No.1’च्या १२ काचेच्या बाटल्या तसेच ‘Oaksmith’च्या ४८ बाटल्यांचा समावेश आहे. या दारूसाठ्याची किंमत ३ लाख ५० हजार २५६ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राजापूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर दारू तस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!