
रत्नागिरी : इंधन तुटवडा, इंधन दरवाढ, वाढते तापमान यामुळे कोकणात येणाऱ्या भाज्यांची आवक मंदावली आहे. याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यालाही बसत असून, परिणामी भाज्यांचे दर वाढले आहेत.
कोकणात बहुतांश भाजीपाला हा कोल्हापूर, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून येतो. मात्र इंधनाचा तुटवडा, तसेच गेल्या दहा दिवसांत चार वेळा झालेल्या इंधन दरवाढ यामुळे घाटमाथ्यावरून कोकणात भाजीपाला घेऊन येणे परवडत नाही, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. घाटमाथ्यावरच्या डिझेल तुटवल्यामुळे आठवडा बाजारात येणाऱ्या भाज्यांची आवकही मोजकीच असल्याचे चित्र आज (२६ मे) रत्नागिरीत भरलेल्या आठवडा बाजारात बघायला मिळाले.
बाजारात सर्वच भाज्यांचे दर १२० रुपये किलोच्या घरात पोचले असून, घेवडा, पावटा, फरसबी या भाज्यांची आवक घटल्याचे चित्र दिसून आले. यामुळे गृहिणी मात्र मेटाकुटीला आली असून, वाढत्या महागाईमुळे घराचे आर्थिक बजेट कोलमडल्याचे काहींनी सांगितले.



