आंबा येथे गॅस टँकर पलटी; चालक जागीच ठार
वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

रत्नागिरी : कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यात आंबा येथे गॅस टँकर पलटी झाल्याची घटना घडली आहे. टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये रिफिल करण्याचे काम आज (२७ मे) रात्री १० नंतर करण्यात येणार असल्याने प्रशासनाने वाहतुकीत तात्पुरते बदल केले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यातून आंबा मार्गे जाणारी सर्व वाहतूक करूळ – भुईबावडा घाट – गगनबावडा – अनुस्कुरा घाट या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी खबरदारी घेऊन प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या चालकाचे नाव महेश संतोष अनभुले (रा. घुमरी, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे आहे. जयगडहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेला गॅस टँकर मंगळवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास आंबा घाटाजवळ पलटी झाला. अपघात इतका भीषण होता की चालकाचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच आंबा महामार्ग पोलिस मदत केंद्र, महामार्ग वाहतूक शाखा आणि स्थानिक प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत परिसर ताब्यात घेतला. सध्या कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावरील वाहतूक सुरू असली, तरी अपघातग्रस्त टँकरमधील एलपीजी गॅस दुसऱ्या टँकरमध्ये स्थलांतरित करण्याचे काम आज बुधवारी रात्री १० नंतर हाती घेण्यात येणार आहे..



