परशुराम घाटात केमिकल टँकरचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गुरुवारी दुपारी केमिकल्सने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास परशुराम घाट उतरत असताना केमिकल्सने भरलेल्या टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, चालक गाडीखाली अडकून जागीच ठार झाला. अपघातानंतर टँकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच चिपळूण नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडीही घटनास्थळी पोहोचली असून बचाव आणि मदतकार्य हाती घेण्यात आले. पोलिसांनी परिसर सुरक्षित करून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू केले.
अपघातानंतर काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
या भीषण अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहनचालकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



