रायगडात महायुतीमध्ये फूट; आमदार महेंद्र दळवी यांच्या कन्या जुईली जुईकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

रत्नागिरी : कोकणात विधानपरिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून, रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांची कन्या जुईली जुईकर यांनी आज (३० मे) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन आपला अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला.
जुईली जुईकर यांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर प्रसार माध्यमांकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर नेहमीच अन्याय होत आला आहे. म्हणूनच आपण हा उमेदवारी अर्ज सादर केला आहे.”
राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांनी जर आपल्याला आदेश दिला तर उमेदवारी अर्ज मागे घेऊ असेही त्यांनी यावेळी सांगितले. विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जुईली जुईकर यांनी उमेदवारी अर्ज भरल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मतदारसंघात महायुतीमध्येच फूट पडल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले आहे.



