विसापूर येथे ड्रेझरला किनारा मिळण्यासाठी बेकायदा भराव
पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी यांची चौकशी करण्याची मागणी

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील दाभोळ खाडीतील विसापूर परिसरात वाळू उपसा करणारे ड्रेझर किनाऱ्याला व्यवस्थित लागावेत यासाठी खाडीच्या किनारी मोठ्या प्रमाणात बेकायदा भराव करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. पंचायत समिती सदस्य मंगेश जोशी हे या कथित बेकायदा भरावाची तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी महसूल विभागाकडे करणार असल्याची माहिती मंगेश जोशी यांनी स्वतः दिली आहे.
खाडीसारख्या संवेदनशील क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे भू-रूपांतर किंवा भराव करण्यासाठी विविध शासकीय परवानग्या आवश्यक असताना हा भराव नेमका कोणाच्या परवानगीने करण्यात आला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
स्थानिकांच्या मते, ड्रेझरना सहजपणे किनाऱ्याला लावण्यासाठी आणि वाळू वाहतुकीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी हा भराव करण्यात आला असावा. जर हे आरोप खरे असतील तर पर्यावरणीय नियम, किनारी क्षेत्र नियमावली आणि महसुली कायद्यांचे गंभीर उल्लंघन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.
विशेष म्हणजे, खाडीत सुरू असलेल्या हालचालींवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि स्थानिक महसूल यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात भराव होत असताना संबंधित यंत्रणांना याची माहिती नव्हती का? माहिती असूनही दुर्लक्ष करण्यात आले का? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे.
परिसरातील नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून भरावाची मोजणी, परवानग्यांची पडताळणी आणि जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आता महसूल विभाग आणि मेरीटाईम बोर्ड या गंभीर आरोपांवर काय भूमिका घेतात आणि प्रत्यक्ष कारवाई करतात का, याकडे संपूर्ण दाभोळ परिसरासह रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जर कारवाई झाली नाही तर प्रशासनाच्या पारदर्शकतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर आणखी प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



