महाराष्ट्रमुख्य बातमी

वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह ३० जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी

मुंबई : भारतीय हवामान विभागाने राज्यातील तब्बल ३० जिल्ह्यांसाठी आज (१० जून) यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्याच्या विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा त्यामध्ये समावेश आहे.

या भागांमध्ये काही ठिकाणी ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात पाऊस सक्रिय होत असला तरी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. जोपर्यंत सर्वत्र समाधानकारक आणि सलग पाऊस पडत नाही, तोपर्यंत खरिपाच्या पेरण्या घाईघाईने करू नयेत, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामान शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी सांगितले की, सध्याचे वातावरण मराठवाड्यात मान्सूनच्या गतीला थोडे रोखत आहे. मात्र, १२ जून ते १८ जून दरम्यान हा मान्सून संपूर्ण मराठवाडा व्यापेल असा अंदाज आहे. हवामान विभागाने नागरिकांना विजा चमकत असताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू असताना शेतात किंवा खुल्या मैदानात काम करणे त्वरित थांबवून सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडांखाली किंवा कच्च्या शेडखाली उभे राहणे टाळावे, कारण तिथे वीज पडण्याचा धोका सर्वाधिक असतो. घरात असताना विजेची उपकरणे प्लगमधून काढून ठेवावीत आणि पोहणारे किंवा पाण्याच्या भागात असलेल्या लोकांनी तातडीने पाण्याच्या बाहेर यावे, जेणेकरून कोणताही अनर्थ घडणारनाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!