युवासेना सडेतोड वक्तृत्व स्पर्धेच्या विभागीय फेरीत यश शेलार आणि श्रावणी आरावंदेकर यांची बाजी
सेनाभवन येथील अंतिम फेरीसाठी निवड

रत्नागिरी : युवासेना कोकण विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ ची विभागीय फेरी रत्नागिरी येथे उत्साहात संपन्न झाली. या चुरशीच्या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील कु. यश नितीन शेलार आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील श्रावणी राजन आरावंदेकर यांनी आपल्या उत्कृष्ट वक्तृत्वाने निर्भेळ यश मिळवले. या दोन्ही विजेत्या स्पर्धकांची निवड आता मुंबईतील सेना भवन, दादर येथे १४ जून रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय अंतिम स्पर्धेसाठी झाली आहे.
कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनही जिल्ह्यांतील प्राथमिक फेऱ्यांमधील विजेत्या स्पर्धकांनी या विभागीय फेरीत भाग घेतला होता. ‘माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी’ आणि ‘२१ व्या शतकातील मराठी अस्मिता: आव्हाने आणि संधी’ या ज्वलंत विषयांवर स्पर्धकांनी आपले विचार मांडले. प्रत्येक स्पर्धकाला आपले मत मांडण्यासाठी ७ मिनिटांचा वेळ देण्यात आला होता.
काल पार पडलेल्या या चुरशीच्या स्पर्धेत माजी मुख्याध्यापक मोहन सावंत आणि शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत यांनी मुख्य परीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यांनी स्पर्धकांच्या सादरीकरणाचे, भाषेचे आणि विषयाच्या मांडणीचे तटस्थ परीक्षण करून विजेत्यांची घोषणा केली.
या सोहळ्यासाठी शिवसेना आणि युवासेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. यावेळी शिवसेना उपनेत्या जान्हवी सावंत मॅडम, महिला लोकसभा संघटक नेहा माने, उपजिल्हा प्रमुख रवींद्र डोळस, युवासेना सहसचिव प्रद्युम्न माने, युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, रत्नागिरी उपतालुका प्रमुख सुभाष पावसकर व विजय देसाई यांच्यासह महिला उपजिल्हा संघटक रशिदा गोडद, महिला शहर संघटक सेजल बोराटे, राजश्रीताई लोटणकर, उपशहर प्रमुख सलील डाफळे, नितीन तळेकर, लांजा शहर प्रमुख मोहन तोडकरी, युवासेना रत्नागिरी शहर प्रमुख आशिष चव्हाण, नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर, विभाग प्रमुख प्रशांत सुर्वे आणि शहानवाझ काझी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विभागीय फेरीत कौतुकास्पद कामगिरी करून यश शेलार आणि श्रावणी आरावंदेकर यांनी मुंबईतील अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. आता १४ जून रोजी दादर येथील शिवसेना भवन येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अंतिम स्पर्धेत हे दोन्ही स्पर्धक कोकण विभागाचे प्रतिनिधित्व करतील, ज्यामुळे संपूर्ण कोकणवासियांचे लक्ष या अंतिम फेरीकडे लागले आहे.



