मुख्य बातमी

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बसची कागदपत्रे वैध ठेवा

उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांचे आवाहन

रत्नागिरी : शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीला प्रशासनातर्फे सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, सर्व स्कूल बस चालक आणि मालकांनी आपल्या वाहनांची सर्व आवश्यक कागदपत्रे वैध (Valid) ठेवावीत, असे आवाहन रत्नागिरीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी केले आहे.

वाहनांची आवश्यक कागदपत्रे वैध असल्याशिवाय कोणतीही स्कूल बस विद्यार्थी वाहतुकीसाठी रस्त्यावर आणू नये, असे आरटीओ कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

स्कूल बस चालक आणि मालकांनी वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC), योग्यता प्रमाणपत्र (Fitness Certificate), परवाना (Permit) आणि विमा (Insurance), प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) ही कागदपत्रे आणि परवाने वैध असणे बंधनकारक आहे.

चालकाचा वैध ड्रायव्हिंग लायसन्स (अनुज्ञप्ती) आणि बॅज

स्कूल बस वाहनांची कागदपत्रे विधीग्राह्य (Valid) करण्यासाठी कार्यालयात सादर करण्यात येणाऱ्या अर्जांना आरटीओतर्फे विशेष प्राधान्य दिले जात आहे. सर्व स्कूल बस धारकांनी या सुविधेचा लाभ घेऊन आपली कागदपत्रे तातडीने पूर्ण करून घ्यावीत.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केवळ आरटीओ प्रशासनानेच नव्हे, तर शाळा आणि पालकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी खालील बाबींची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे:

विद्यार्थ्यांची वाहतूक कोणत्याही अनधिकृत, अवैध किंवा धोकादायक पद्धतीने होणार नाही, याची काळजी घ्यावी. मुले केवळ वैध कागदपत्रे असलेल्या सुरक्षित वाहनातूनच प्रवास करतील याकडे पालकांनी व शाळा व्यवस्थापनाने लक्ष द्यावे.

१८ वर्षांखालील अल्पवयीन मुलांकडे वैध लायसन्स नसते. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांकडून कोणत्याही परिस्थितीत वाहन चालवले जाणार नाही, याची दक्षता पालक आणि शिक्षकांनी काटेकोरपणे घ्यावी.

शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आणणाऱ्या घटकांवर आरटीओ प्रशासन कडक पावले उचलणार आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि अवैधपणे वाहतूक करणाऱ्या दोषी वाहनांवर विशेष तपासणी मोहीम राबवून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!