मुख्य बातमी

कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरमध्ये शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

रत्नागिरी : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कै. ल. ग. पटवर्धन प्राथमिक विद्यामंदिरात १५ जून रोजी नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी शाळा प्रवेशोत्सव अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची शालेय परिसरातून भव्य ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान मुलांवरती पुष्पवृष्टी करण्यात आली. शाळेच्या प्रवेशद्वारापाशी सर्व मुलांचे औक्षण करण्यात आले. पेढा देण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याचे रंगाने उमटवलेले शाळेतील पहिले पाऊल त्यांना आनंद देऊन गेले.

मुलांच्या स्वागतासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी जय्यत तयारी केली होती. शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी वेलकम लिहिलेली आकर्षक कमान उभारण्यात आली. फुलांच्या माळा लावण्यात आल्या. रंगीबेरंगी फुलांनी परिसर सजवला. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण शाळा आणि वर्गखोल्या रंगीबिरंगी फुगे, तोरणे आणि रांगोळीने सजवण्यात आल्या. सर्व विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तकांचेही वाटप करण्यात आले. सेल्फी पॉइंटसाठी स्कूलबसची प्रतिकृती तयार करण्यात आली होती. या सेल्फी पॉईंटचा नवीन विद्यार्थ्यांनी सेल्फी काढून आनंद घेतला. दुपारच्या पोषण आहारामध्ये सर्वांना गोड शिरा देण्यात आला. प्रवेशोत्सवामुळे पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांच्या मनातील शाळेची भीती दूर होऊन त्यांच्या मनात शिक्षणाविषयी नवा उत्साह आणि आनंद निर्माण झाला.

या कार्यक्रमाला शालेय समिती अध्यक्ष मनोज पाटणकर तसेच पालक प्रतिनिधी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या. प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्तमरीत्या साजरा करण्यासाठी मुख्याध्यापिका सौ. सायली राजवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!