मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

टेरव येथे श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात संपन्न

चिपळूण : तालुक्यातील श्री क्षेत्र टेरव राधाकृष्णवाडी येथील स्वयंभू जागृत, पुरातन, निसर्गसंपन्न व सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खेर्डोबेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार काल (१५ जून) मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाला. यानिमित्त अभिषेक, होम हवन, श्री सत्यनारायण महापूजा, महाआरती, महाप्रसाद, श्री राधाकृष्ण भजन मंडळाचे सुस्वर संगीत भजन, हरिपाठ, कीर्तन व रात्री महाप्रसाद अशा विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

हिरव्यागार निसर्गसंपन्न परिसरात वसलेल्या या मंदिराची दुरावस्था झाल्यामुळे सन २००२ साली यापूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला होता. नवीन वास्तू उभारणीचा संकल्प करून १५ जून रोजी या मंदिराचे उद्घाटन रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे, चिपळूण पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत खेतले, जि.प. सदस्या पूजा निकम यांच्यासह अन्य अनेक मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. श्री खेर्डोबेश्वर मंदिरात स्वयंभू शंकराचे दर्शन घेणाऱ्या भाविकांना आंतरिक बळ मिळते तसेच मंदिराच्या प्रांगणात आगळं वेगळं समाधानही लाभते म्हणूनच श्रावण महिन्यात मंदिरात अभिषेक करण्यासाठी गर्दी होत असते. श्री क्षेत्र टेरव गावातील खेर्डोबा, धोकटोबा व म्हसोबा ह्या पुरातन ठिकाणी देवदेवतांचा वावर आहे असे गावातील ज्येष्ठ ग्रामस्थ आजही सांगत असतात.

महाराष्ट शासन, वन विभाग यांनी वन विभागामार्फत उपलब्ध असलेल्या सेवा तसेच सामाजिक वनीकरण अंतर्गत विविध योजनांची माहिती डिजिटल स्क्रीन द्वारे उत्सवास उपस्थित असलेल्या ग्रामस्थाना दिली. देणगीदार, वर्गणीदार, हितचिंतक, सर्व ठेकेदार, मंडप डेकोरेटर, वायरमन, आचारी, राधाकृष्णवाडी भजन मंडळ व सहकार्य करणारे सर्वांचे यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.

मंदिर जीर्णोद्धाराची कामे मानसिंगराव कदम यांच्या नेतृत्वाखाली वाडीतील सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे पार पाडून एक सुंदर, सुबक मंदिराची निर्मिती करण्यात आली. जीर्णोद्धार प्रसंगी सहपरिवार, मित्रमंडळींसह अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेऊन उत्सवाचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल भाविक, पर्यटक, ग्रामस्थ यांचे सर्वश्री बजाजी कदम अध्यक्ष, श्री राजेंद्र कदम चिटणीस व श्री अक्षय सागवेकर खजिनदार, खेर्डोबेश्वर देवस्थान व्यवस्थापन समिती यांनी आभार व्यक्त केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!