पूर्णगड जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव उपक्रम उत्साहात

रत्नागिरी : तालुक्यातील जि. प. आदर्श शाळा पूर्णगड नं. मध्ये शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरात रॅली काढून शाळा प्रवेश जनजागृती करण्यात आली. त्यानंतर नवागतांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले.
यावेळी मोफत पाठ्यपुस्तके, मोफत गणवेशाचे वाटप करण्यात आले. शाळा पूर्वतयारी मेळावा क्र. २, पहिले पाऊल हे उपक्रमही यावेळी उत्साहात राबविण्यात आले.
यावेळी पंचायत समिती गावखडी गणाच्या स्वाती शिंदे, केंद्रप्रमुख महेश तोडणकर, शाळा व्यवस्थापन समिती, पालक, ग्रामस्थ उपस्थित होते. स्वाती शिंदे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. गोखले ट्रस्ट पुणे यांच्याकडून मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. पूर्णगडचे पोलीस पाटील संतोषी पाथरे यांच्याकडून शाळेचे दप्तर, कंपास पेट्या यांचे, तर श्री. बागवे यांच्याकडून वह्या वाटप करण्यात आले.
उपक्रम यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वाकडे, शिक्षक भारती शिंगाडे, राजेंद्र रांगणकर, तृप्ती शिरगावकर यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमाविषयी शिक्षण विस्तार अधिकारी बीट पावस श्रीमती हिरवे यांनी समाधान व्यक्त केले.



